तिवसा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:09 AM2021-07-23T04:09:43+5:302021-07-23T04:09:43+5:30
तिवसा : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा कार्यकाळ १८ जुलै रोजी संपुष्टात आला असून, या ग्रामपंचायतींना मुदतवाढ मिळणार की, प्रशासक नेमनार ...
तिवसा : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा कार्यकाळ १८ जुलै रोजी संपुष्टात आला असून, या ग्रामपंचायतींना मुदतवाढ मिळणार की, प्रशासक नेमनार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, येथे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्याने या चर्चेला विराम मिळाला.
उंबरखेड, आखतवाडा, घोटा, कवाडगव्हाण या ग्रामपंचयतीचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपणार असला तरी निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम, प्रक्रिया प्रभाग रचना, प्रारूप, सोडत हरकती, सूचना याबाबत कुठलाही कार्यक्रम राबविण्यात आला नसल्यामुळे या ग्रामपंचायत निवडणूक तूर्त होणे नसल्याची दाट शक्यता होती. आता या चार ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य यांचा कार्यकाळ संपला आहे.
या चारही ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. आखतवाडा, उंबरखेड या ग्राम पंचायतीवर विस्तार अधिकारी एस.एस. पुनसे, घोटा ग्रामपंचायत येथे विस्तार अधिकारी अंबादास रामटेके, तर कवाडगव्हाण ग्रामपंचायतीत जी. बी. बारखडे विस्तार अधिकारी पंचायत समिती तिवसा यांची ग्राम पंचायत प्रशासक पदी नेमणूक करण्यात आली आहे.
तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली. तिवसा तालुक्यातील ४५ ग्राम पंचायतींचे सरपंचपदाचेसुद्धा आरक्षण काढण्यात आले होते. आता या चार ग्रामपंचयतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. या चारही ग्राम पंचायत निवडणुका आता कधी होणार आहे, याची उत्सुकता गावपातळीवरील पुढाऱ्यांना लागली आहे.