अचलपुरात कोरोनाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 10:06 PM2020-03-06T22:06:33+5:302020-03-06T22:07:18+5:30
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना तोंडावर मास्क घालण्यास सांगितले आहे. आॅटोरिक्षातून शाळेत शेकडो विद्यार्थी मास्क घालून निघाल्याचे अचलपुरात दिसून येत आहे. त्याचबरोबर वेळोवेळी हात धुण्यासाठी सांगितले असून, सॅनिटायझर सोबत बाळगण्याचेसुद्धा विद्यार्थी वर्गाला काही खासगी शाळांनी सांगितले. विद्यार्थ्यांना गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे, ..........
लोकमत न्यूज नेटवर्क
अचलपूर : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसपासून होणाºया आजाराची दहशत अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे. चौकाचौकांत पानठेल्यावर, कटिंगच्या दुकानासह सोशल मीडिया तसेच वृत्तवाहिन्यांवर सर्वत्र चर्चेत असलेल्या कोरोना व्हायरसपासून बचावाकरिता अचलपूर येथील नागरिक सरसावले आहेत.
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना तोंडावर मास्क घालण्यास सांगितले आहे. आॅटोरिक्षातून शाळेत शेकडो विद्यार्थी मास्क घालून निघाल्याचे अचलपुरात दिसून येत आहे. त्याचबरोबर वेळोवेळी हात धुण्यासाठी सांगितले असून, सॅनिटायझर सोबत बाळगण्याचेसुद्धा विद्यार्थी वर्गाला काही खासगी शाळांनी सांगितले. विद्यार्थ्यांना गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे, धूलिवंदनाच्या दिवशी ‘चायना मेड’ रंग लावू नये, अशा सूचनासुद्धा पालकांना दिल्या आहेत.
अचलपूर परिसरात आजपर्यंत कोणीही कोरोना व्हायरसने बाधित आढळून आलेला नाही. मात्र, शहरात मास्क विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. आपल्या पाल्यांसाठी मास्क मिळविण्याकरिता पालकांची भटकंती होत आहे आहे. त्याचबरोबर हाताला लावण्याकररिता अल्कोहोलची विक्री होत आहे. लहानांपासून तर वृद्धापर्यंत कोरोना व्हायरसचीच चर्चा अचलपुरात दिसून येत आहे. अनेक दुकानदारसुद्धा बचाव म्हणून मास्क घालताना दिसून येत आहे.
कोरोना आजारापासून बचाव महत्त्वाचा आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. वारंवार हात धुवा. भरपूर पाणी प्या. शिंकताना तोंडावर रू माल ठेवा. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. अचलपूर रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. सध्या कोणालाही लागण झाली नाही.
- डॉ. सरवत वर्मा, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय
सर्व लहान विद्यार्थ्यांना शाळेत येताना तोंडावर मास्क घालून येण्याचे व शाळेत, घरी हात धुण्यास सांगितले आहे. स्वत:ची स्वच्छता ठेवण्यास सांगितले आहे. सर्दी-ताप आल्यावर घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. संपूर्ण शहरात कोरोना संसर्गाची दहशत आहे.
- राधा नीलेश तारे मुख्याध्यापिका