मेळघाटच्या जंगलात डिंक तस्करांची दहशत; नाकाबंदीत वनरक्षकाला दगड, काठीने मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 11:36 AM2023-03-03T11:36:32+5:302023-03-03T11:37:39+5:30

गुंड तस्करांची दादागिरी; गुन्हा दाखल

Terror of Gum Smugglers in Melghat Forest; A forest guard was beaten with stones and sticks during the blockade | मेळघाटच्या जंगलात डिंक तस्करांची दहशत; नाकाबंदीत वनरक्षकाला दगड, काठीने मारहाण 

मेळघाटच्या जंगलात डिंक तस्करांची दहशत; नाकाबंदीत वनरक्षकाला दगड, काठीने मारहाण 

googlenewsNext

परतवाडा (अमरावती) : रात्री जंगलगस्तीवर नाकाबंदीदरम्यान कार्यरत वनकर्मचाऱ्यांनी डिंक तस्करी करीत असल्याच्या संशयावरून भरधाव जाणाऱ्या दुचाकीस हात दाखविला. दुचाकी न थांबविता अंगावर आणून पुढे निघून गेले व परत येऊन मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री रेहट्या ते शिवाझिरी जंगलात घडली. धारणी पोलिसांनी फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या घटनेने मेळघाटच्या जंगलात पुन्हा गोंद तस्करी पुढे आली आहे.

वनरक्षक राजू प्रभाकर बुरकुले (३३, रा. डाबका) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून धारणी पोलिसांनी आरोपी सुरेश गोरेलाल चोंगळ (३८), मन्साराम गोरेलाल चोंगळ (३२), मन्या गोरेलाल चोंगळ (३०) व बादशाह मेहताब मोरे (२८, सर्व रा. शिवाझिरी) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस सूत्रांनुसार वनरक्षक राजू बुरकुले सुसर्दा परिक्षेत्राच्या रेहट्या बीटमध्ये ते मागील सात वर्षांपासून कार्यरत आहेत.

अंगावर आणली दुचाकी

राजू बुरकुले हे मंगळवारी रात्री सहकारी वनरक्षक शेरू राठोड, मन्नू वाकोडे व वनमजूर महेंद्र नागले, शुभम इंगोले, सुभाष धांडे यांच्यासमवेत रेहट्या ते शिवाझिरी रोडवर नाकाबंदी करीत असताना एक दुचाकी भरधाव आली. डिंकासारख्या वनउपजाचा संशय आल्याने ती दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, वनकर्मचाऱ्यांच्या अंगावर आणली आणि न थांबता पुढे निघून गेली.

अश्लील शिवीगाळ, दगडाने व काठीने मारले

अर्ध्या तासाने दोन दुचाकीवर चार जण आले. त्यांनी अश्लील शिवीगाळ करीत हुज्जत घातली. काठीने मारहाण करीत गालावर दगडाने मारले. जंगल आमच्या बापाचे आहे, असे म्हणत झटापट केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गोंद तस्करांची जंगलात दहशत

धुळघाट, सुसर्दा या परिसरात सालई प्रजातीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्या झाडाच्या गोंदाची तस्करी मध्य प्रदेश व इतर परिसरात मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे अनेकदा घटनांनी पुढे आले आहे. त्याला आळा घालणाऱ्या वनरक्षकांवर हमला करण्यात आल्याने गुंड तस्करांची दहशत दादागिरी या घटनेने पुढे आली आहे.

जंगलात गस्तीवर असलेल्या वनरक्षकांना मारहाण करण्यात आली. त्यासंदर्भात धारणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोंद तस्कर असल्याचे पुढे आले असून इतरही चौकशी सुरू आहे.

- शुभांगी डेहनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुसर्दा, ता. धारणी

Web Title: Terror of Gum Smugglers in Melghat Forest; A forest guard was beaten with stones and sticks during the blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.