शहरभर तडिपारांचा हैदोस; तीन कुख्यात गुंड अटकेत
By प्रदीप भाकरे | Published: January 18, 2023 06:21 PM2023-01-18T18:21:52+5:302023-01-18T18:22:57+5:30
यापूर्वी दुचाकी चोरीत अटक : 'डीबी'चे अपयश उघड
अमरावती : शहर गुन्हे शाखेने १६ जानेवारी रोजी एकाच दिवशी चार गुंडांना तडीपार आदेशाचे उल्लंघन करताना रंगेहाथ पकडले. तडिपारांच्या त्या मुक्त सैरसपाट्याची मालिका सुरूच असून, १७ जानेवारी रोजी देखील अशाच तीन तडिपारांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना शहरात न परतण्याची समज देण्यात आली. दोन दिवसांत तब्बल सात तडीपार शहरातच आढळून आल्याने संबंधित 'डीबी'वर प्रश्नचिन्ह लागले आहे.
कुख्यातांनी गुन्हे करून ‘क्राईम रेट’मध्ये भर टाकू नये अन् कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सराईत आणि कुख्यातांना विशिष्ट कालावधीकरिता शहर तथा जिल्ह्यातून तडीपार केले जाते. मात्र, अनेक तडीपार दुसऱ्या जिल्ह्यात न जाता, न थांबता परततात. अनेक तडिपारांचा गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. गुन्हे शाखा वा संबंधित पोलिस ठाणे अशा गुंडांना तडीपारीचे आदेश डावलून फिरत असताना ताब्यात देखील घेते. मात्र, एक-दोन दिवसांनी तो आपल्या मूळ ठिकाणी दिसून येतो. त्याला खाकीतील काही शुक्राचार्यांचाही वरदहस्त असतो, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीपी नवीनचंद्र रेडडी यांना ठाणे व डीबीप्रमुखांना मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे.
पांडे वारंवार शहरात
पोलिस उपायुक्तांच्या आदेशाने गुरूप्रसाद पांडे (३५, केडियानगर) याला २२ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या आदेशाने एक वर्षाकरिता आयुक्तालय हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तो वारंवार ते आदेश डावलून शहरात वावरत असतो. दरम्यान, १६ जानेवारी रोजी रात्री १०:०८ मिनिटांनी डायल ११२ वर एक इसम केडियानगर भागात लोकांसोबत वाद घालत असल्याचा कॉल करण्यात आला. त्या काॅलवर मार्शल ड्युटीवर असलेले हवालदार अंकुश काळे हे तेथे पोहोचले असता, तेथे तडीपार मुकेश पांडे हा वाद घालताना दिसून आला. पांडे याला अलीकडेच तडिपारीच्या कालावधीत दुचाकी चोरीत अटक करण्यात आली होती.
तडिपाराकडून चाकू जप्त
अंजनगाव बारी येथील तडीपार आरोपी श्रीकृष्ण रामराव आखरे (३६) याला दहशत माजवताना अटक करण्यात आली. १७ जानेवारी रोजी दुपारी त्याला चाकूसह ताब्यात घेण्यात आले. त्याला १३ ऑगस्ट २०२१ रोजीच्या आदेशाने तडीपार करण्यात आले आहे. तर, मुकेश गिरी (३०, रा. अंकुरनगर, कुंभारवाडा) याला देखील १७ जानेवारी रोजी तडीपार आदेशाचे उल्लंघनाच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले.