मोर्शीत नाफेडच्या खरेदी केंद्राकडे फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:08 PM2018-02-07T22:08:22+5:302018-02-07T22:08:40+5:30
स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीत सुरू करण्यात आलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.
गोपाल डहाके ।
आॅनलाईन लोकमत
मोर्शी : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीत सुरू करण्यात आलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. दररोज ५० जणांना बोलावले जात असताना, १०-१२ शेतकरीच केंद्रावर तूर विक्रीसाठी आणत आहेत.
मोर्शी येथे ४ फेब्रुवारीला आ. अनिल बोंडे यांच्या हस्ते नाफेडच्या केंद्राचे उद्घाटन झाले. आॅनलाइन प्रक्रिया अंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्याकडील तूर क्रमवार या केंद्रावर आणली असता, हेक्टरी सहा क्विंटल माल घेऊन उर्वरित तूर शेतकºयांना परत केली जात आहे. ज्या शेतकऱ्याला एकरी पाच-सहा क्विंटल तुरी पिकल्या, त्यांना एकरी २ क्विंटल ४० किलो तूर नाफेडला दिल्यानंतर उर्वरित माल परत न्यावा लागतो किंवा स्थानिक व्यापाऱ्यांना द्यावा लागतो. यामध्ये शेतकऱ्यांना वाहन भाडे व खर्च अधिक प्रमाणात होत आहे.
नाफेड केंद्रांवर ठरविण्यात आलेल्या हेक्टरी उत्पादनातही तफावत आहे. वर्धा जिल्ह्यासाठी हेक्टरी १२ क्विंटल, नागपूर जिल्ह्यासाठी १६ क्विंटल अशी मर्यादा असताना, अमरावती जिल्ह्यामध्ये हेक्टरी ६ क्विंटल (एकरी २ क्विंटल ४० किलो) अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.
मोर्शी तालुक्यात माडा पेरणी केलेल्या तुरीचे उत्पादन सरासरी एकरी ६ क्विंटलच्या वर आहे. नाफेड केंद्रावरील विसंगतीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी या केंद्राकडे पाठ फिरविली आहे. आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी दररोज ५० शेतकऱ्यांना तूर विक्रीस बोलावले जाते. परंतु, त्यापैकी १० ते १२ शेतकरी नाफेड तूर खरेदी केंद्रावर येतात. त्यामुळे येथील केंद्राची आवक मंदावली आहे. महाराष्ट्र शासनाने ५४५० रुपये हमीभाव दिला असूनदेखील शेतकरी त्याचा घेऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे.
शेतकऱ्यांचा माल चाळणी लावून घेतला जातो व उर्वरित तूरही पडून राहते. आॅनलाईन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना त्रास वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसते.
- लाभेश लिखितकर,
सचिव, कृ.उ.बा.स.मोर्शी