‘तो’ परिसर दीड किमी बफर झोन घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:01:02+5:30
त्या परिवारातील दोन्ही मुलांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. सोमवारी याचा अहवाल प्राप्त होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. दरम्यान या संशयित रुग्णाचे वास्तव्य असणाºया हैदरपुरा परिसरातील प्रत्येक घराला गृहभेटी देण्याकरिता १० पथके तयार करण्याचे आदेश आयुक्त प्रशांत रोडे यांनी रविवारी हैदरपुरा शहरी आरोग्य केंद्राच्या स्त्री वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक हैदरपुरा येथील एक व्यक्ती मेरठमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने या परिवाराच्या येथील दोन्ही मुलांना रविवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी त्या संशयितांच्या घराचे दीड किमी परिघातील परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. या परिसरात आता आरोग्य पथकाद्वारे त्वरेने गृहभेटी व प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे.
त्या परिवारातील दोन्ही मुलांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. सोमवारी याचा अहवाल प्राप्त होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. दरम्यान या संशयित रुग्णाचे वास्तव्य असणाऱ्या हैदरपुरा परिसरातील प्रत्येक घराला गृहभेटी देण्याकरिता १० पथके तयार करण्याचे आदेश आयुक्त प्रशांत रोडे यांनी रविवारी हैदरपुरा शहरी आरोग्य केंद्राच्या स्त्री वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार या पथकामार्फत परिसरात गृहभेटीचे काम सुरू केल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी दिली. गृहभेटीदरम्यान कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
आयुक्तांच्या आदेशानुसार संशयित रुग्णांच्या घराचे आजूबाजूला एक किलोमीटर परिसरात ये-जा करण्यास मज्जाव व पोलिसांमार्फत नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. हैदरपुरा विभागामध्ये कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) च्या जनजागृतीसाठी संपूर्ण परिसरात दोन ऑटोंद्वारा पाच दिवस उद्घोषणा केली जाणार आहे. दहा वैद्यकीय पथकांद्वारे हैदरपुरा विभागात दिलेल्या गृहभेटीचा दैंनदिन अहवाल मार्गदर्शक सूचनानुसार महापालिका कार्यालयास सादर करावा लागणार आहे. कोरोना रुग्णाचा ज्या नातेवाईक व नागरिकांशी संपर्क आला, त्यांची यादी तयार करून त्यांचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे. रुग्णाचा ज्या नागरिकांशी संपर्क आला त्यांची माहिती पथकाद्वारा घेतली जात आहे. या परिसरातील रुग्णांचे नियमित अहवाल सादर करणे पथकाला बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णाचा ज्यांच्यासोबत संपर्क आला असेल त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
पथकास अनेकांचे असहकार्य
हैदरपुरा परिसरातील रुग्ण संशयित असल्याने महापालिका पथकाद्वारा रविवारपासूनच गृहभेटी सुरू केल्या आहेत. मात्र, काही नागरिकांनी असहकार्य केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे या परिसरात जनजागृतीवर अधिक भर देण्यात येत आहे. यासाठी स्थानिक पदाधिकाºयांची मदत घेणार व गरज भासल्यास पथकासोबत पोलीस कर्मचारी ठेवणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
हैद्राबाद फ्लाईटमधील महिला होम क्वारंटाईन
हैद्राबाद येथे फ्लाईटने आलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याची सहप्रवासी असणाºया महिलेची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. पथकाद्वारा त्वरित त्या महिलेची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली व नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. तसेच येथील कँप परिसरात वास्तव्याला असणाऱ्या महिलेला १४ दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
नागरिकांना विश्वासात घेणार
हैदरपुºयातील दीड किमीच्या बफर झोन परिसरातील नागरिकांना घरातच क्वारंटाईन व्हावे, यासाठी त्यांना विश्वासात घेणार आहे. स्थानिक नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी यासाठी सहकार्य करीत आहेत. या बाधित व्यक्तीच्या संपर्कात कुणी आले काय, कुणी आजारी आहेत कां, याविषयीची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.
२,१६२ नागरिक होम क्वारंटाइनमध्ये
परदेशातून, देशांतर्गत तसेच पुणे व मुंबई येथून आलेल्या २,१६२ व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी ८४ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६८ नमुने निगेटिव्ह असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला रविवारी प्राप्त झाला. एकूण १० नमुने तांत्रिक कारणाने नाकारण्यात आलेले आहे, तर ६ नमुने प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.