ठाकरे सरकार कोराना रोखण्यात अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:13 AM2021-02-10T04:13:50+5:302021-02-10T04:13:50+5:30
अमरावती : कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडून मातोश्रीच्या बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
अमरावती : कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडून मातोश्रीच्या बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्यात आघाडी नव्हे तर बिघाडी सरकार असल्याचा प्रहार खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी लोकसभेत केला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर असल्याचा आशावाद व्यक्त केला. अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातला. अनेक प्रकल्पांना स्थगिती देणारे ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली.
कोरोना महामारीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत मातोश्री या निवासस्थानी बसून राहिले. त्यांनी कधीही ‘माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी’ असे वर्तन केले नाही. त्यामुळे राज्याच्या जनतेला कोरोना काळात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. कोराेना संक्रमित रुग्ण आणि मृत्यूसंख्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांसाठी कुठल्याही निधीची तरतूद न करता केवळ पंतप्रधान निधीला विरोध करण्याचा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी राबविला. भंडारा येथे १० नवजात बालकांचे मृत्यू आणि यवतमाळ येथे पोलिओ लसीऐवजी बालकांना सॅनिटायझर देण्यात आल्याच्या घटनांचा त्यांनी दाखला दिला. शेतकऱ्यांच्या मुद्यांवर मी आणि आमदार रवी राणा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला निघालो असताना मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अमरावतीत अडवून ठेवल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला.