गुंडाचा पाठलाग करताना ठाणेदाराने रोखली पिस्तूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:18 PM2019-02-16T23:18:32+5:302019-02-16T23:19:21+5:30
एक १७ वर्षीय तरुण चाकुचा धाक दाखवून नागरिकांची लुटमार करीत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार चटकन खुर्चीवरून उठले आणि माहिती देणाºयालाच दुचाकीवर घेऊन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाहून चाकू दाखविणाºया तरुणाचे अवसान गळाले आणि तो सैरावैरा पळत सुटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एक १७ वर्षीय तरुण चाकुचा धाक दाखवून नागरिकांची लुटमार करीत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार चटकन खुर्चीवरून उठले आणि माहिती देणाऱ्यालाच दुचाकीवर घेऊन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाहून चाकू दाखविणाऱ्या तरुणाचे अवसान गळाले आणि तो सैरावैरा पळत सुटला. त्याचा ठाणेदार व पोलीस हवालदार गल्लीबोळातून पाठलाग करीत होते. ठाणेदारांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर रोखून त्या तरुणाला थांबण्यास सांगितले. त्यानंतरही सैरावैरा पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अखेर दोनशे ते तीनशे मीटर अंतरापर्यंत पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.
चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग खोलापुरी गेट हद्दीतील महाजनपुरा येथे शनिवारी दुपारी १.४५ च्या सुमारास नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिला. आरोपी तरुणाचा पाठलाग करणारे खोलापुरी गेटचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम होते. मलकापूर (ता. भातकुली) येथील एक तरुण शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात धडपडत पोहोचला. ठाणेदार मेश्राम त्यावेळी खुर्चीवर आसनस्थ होते. महाजनपुरा परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एक तरुण मोठा चाकू हाती घेऊन नागरिकांना धमक्या देत लुटपाट करीत आहे. मलासुद्धा त्याने चाकू दाखवून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला, असे त्या तरुणाने ठाणेदाराला सांगितले. हा प्रकार ऐकून ठाणेदारांनी खुर्ची सोडली आणि त्या व्यक्तीला दुचाकीवर बसविले. हवालदार हरीश भुजाडे यांनाही सोबत घेतले.
गल्लीबोळातून ठाणेदार मेश्राम व भुजाडे महाजनपुºयात पोहोचले. पोलिसांना पाहून त्या तरुणाने गल्लीबोळातून धूम ठोकली. दरम्यान, पाठलागावर असलेले ठाणेदार मेश्राम यांनी पिस्टल त्या तरुणाकडे रोखली. मात्र, तो पळतच सुटला होता. अखेर त्यांनी त्या तरुणाला घेराव घालून ताब्यात घेतले. पोलीस व्हॅन बोलावून त्याला ठाण्यात नेले. ठाणेदारांनी तात्काळ दखल घेत स्वत:च धावपळ करून चाकू दाखविणाºया तरुणाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतल्याची पहिलीच घटना शहरात असावी, असे दिसून येत आहे. हा प्रकार बघून नागरिकांमध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आॅटोरिक्षाच्या काचा फोडून लुटले पाचशे रुपये
आकाश बारीलाल सोळंके (२२, रा.गोपालनगर) हा एमएच २७ बीडब्ल्यू ३११४ क्रमांकाच्या आॅटोरिक्षाने प्रवासी घेऊन दुपारी १.३० वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकावरून खोलापुरी गेटकडे जात होता. महाजनपुरा परिसरात मद्यपीने आॅटोरिक्षा थांबविली. त्याने आकाशच्या गळ्याला चाकू लावून खिशातील पैसे काढले. आॅटोरिक्षाच्या काचा दगडाने फोडल्या. या गोंधळानंतर आकाशने खोलापुरी गेट ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.
अल्पवयीनाविरुद्ध आतापर्यंत पाच गुन्हे
खोलापुरी गेट हद्दीतील हा १७ वर्षीय अल्पवयीन अनेक वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा आहे. याशिवाय अन्य काही गुन्ह्यांमध्ये त्या अल्पवयीनाचा समावेश आहे. तो नुकताच बाल निरीक्षणगृहातून बाहेर आला. अल्पवयीन असल्याचा फायदा उचलून तो गुन्हेगारी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.