ठाणेदाराविरोधात नगरसेवकांचे धरणे
By admin | Published: March 30, 2015 12:15 AM2015-03-30T00:15:08+5:302015-03-30T00:15:08+5:30
पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलविलेल्या नागरिकांचा तसेच पोलीस कोठडीतील आरोपींचा ठाणेदार छळ करीत असल्याचा ...
अंजनगांव सुर्जी : पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलविलेल्या नागरिकांचा तसेच पोलीस कोठडीतील आरोपींचा ठाणेदार छळ करीत असल्याचा आरोप ठेऊन त्यांच्या चौकशी व निलंबनाच्या मागणीसाठी आंदोलकांनी रविवारी स्थानिक पोलीस ठाण्यासमोर दोन तास धरणे आंदोलन केले. या आंदोलनात आमदार बच्चू कडू सहभागी झाले होते. मात्र, ठाणेदार पडघन यांच्या समर्थनात शिवसेनेची युवक संघटना रस्त्यावर उतरली असून त्यांनी ठाणेदाराला पाठिंबा दिला आहे.
उपरोल्लेखित प्रकरणाची चौकशी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण अवलंबिले व आंदोलकांना विश्वासात घेतले नाही, हा आंदोलकांचा प्रमुख आरोप होता. नगरसेवक शंकर मालठाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिलेल्या लेखी आश्वासनानुसार या प्रकरणाची ९० टक्के चौकशी पूर्ण झाली असून उर्वरीत चौकशी येत्या पंधरा दिवसात पूर्ण करून दोषींवर कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले.
धरणे आंदोलनापूर्वी आंदोलकांनी गावात दुचाकीने फिरून दुकानदारांना सक्तीने दुकाने बंद करण्यास सांगितले. दुपारी एक वाजता धरणे आंदोलनास सुरूवात झाली व आमदार कडू यांच्या भाषणाने या आंदोलनाची सांगता झाली. दोषी असलेल्या अधिकाऱ्याची बदली न करता त्याला येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. बाजारपेठ बंद ठेवण्याच्या आंदोलकांच्या मागणीला अल्प प्रतिसाद प्राप्त झाला.
काही नगरसेवकांनी आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगरसेवकाच्या आक्षेपार्ह विधानाचा आमदार बच्चू कडू यांनी निषेध केला. ठाणेदाराच्या समर्थनात शिवसेनेची युवा संघटना रस्त्यावर उतरली असून युवासेनेचे शहराध्यक्ष अभिजीत भावे यांनी ठाणेदार पडघन हे एक प्रामाणिक अधिकारी असून समाजकंटकांनी चालविलेल्या आंदोलनाची दखल न घेता पडघन यांनाच शहरात कायम ठेवण्याचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. एका पक्षाकडून ठाणेदाराच्या विरोधात भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे युवा सेनेने समर्थन केल्याने चर्चांना उत आला. (तालुका प्रतिनिधी)