थॅलेसेमियाग्रस्तांचे जीवन रक्तावर अवलंबून
By admin | Published: May 8, 2017 12:14 AM2017-05-08T00:14:12+5:302017-05-08T00:14:12+5:30
थॅलेसेमिया हे आनुवंशिक आजार आहे. यामध्ये रुग्णांच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण अस्थिर असते.
इंदल चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : थॅलेसेमिया हे आनुवंशिक आजार आहे. यामध्ये रुग्णांच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण अस्थिर असते. हिमोग्लोबीनमधील अल्फा व बिटा चेनच्या रचनेत दोष असतो. त्यामुळे लाल रक्तपेशींचा लवकर नाश होतो. परिणामी हिमोग्लोबीन कमी होतो. अशा रुग्णांना वारंवार संक्रमण करावे लागते.
लक्षणे
वयाच्या ३ ते ६ महिन्यांपासून दिसू लागते. बाळाचे हिमोग्लोबी तीव्रतेने कमी होणे, सतत भूक लागणे, उलट्या, जुलाब होणे, जंतूसंसर्ग होणे, शरिराची वाढ खुंटणे, सतत आजारी राहणे ही थॅलेसेमिया आजाराची लक्षणे आहेत.
उपचार
रुग्णांना दर ४ ते ६ आठवड्यांनी वारंवार रक्त संक्रमण करावे लागते. यामुळे अशा रुग्णांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते, ते स्थिर ठेवण्यासाठी औषधी घ्यावी लागते, असे डे केअर युनिट हिमॉटॉलॉजी विभागाचे अधिकारी मनोज सहारे यांनी सांगितले.
पती-पत्नी थॅलेसेमिया मायनर असल्यास हे करा
असे रुग्ण पूर्णपणे निरोगी असतात. परंतु पती-पत्नी दोघेही थॅलेसेमिया मायनर असतील तर त्यांच्या बाळांना थॅलेसेमिया मेजर होण्याची शक्यता असते. तेव्हा पत्नीला गर्भधारणा झाल्यास त्यास्थितीत ८ ते १२ आठवड्यापर्यंत गर्भाची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामध्ये जर बाळ थॅलेसेमिया मेजरग्रस्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करावे. ही तपासणी मुंबईच्या केईएम हॉस्टिपटमध्ये केली जाते. या आजारावर मुळातून उपचार करण्यासाठी "बोनमॅरो ट्रान्सप्लांट" ही प्रक्रिया केली जाते. परंतु ही प्रक्रिया महागडी असल्याने अनेक रुग्ण ती करू शकत नाही. मात्र येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजारावर मोफत उपचार केला जातो. त्यामुळे येथे विविध जिल्ह्यातून रुग्ण उपचारार्थ येतात.
अशी घ्या काळजी
वारंवार रक्त संक्रमण केल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढून रुग्णाला मधुमेह, हृदयरोग होऊ शकतो. रक्तपेशी लवकर तोडण्याचे काम पानथडीमध्ये होते. त्यामुळे त्याचा आकार सामान्य आकारापेक्षा अधिक वाढतो. उंच ठिकाणावर जाणे टाळावे, नियमित आहार घ्यावा, नियमित आराम करावा, पाणी भरपूर प्यावे, नियमित साधारण व्यायाम करावा, हिमोग्लोबीनची नियमित तपासणी करावी, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घ्यावे.
प्रकार
थॅलेसेमियाचे दोन प्रकार आहेत. थॅलेसेमिया मायनर आणि मेजर. थॅलेसेमिया मायनरचे रुग्ण पूर्णपणे निरोगी असतात. त्यांना दैनंदिन जीवनात कुठलीही अडचण नसते. परंतु थॅलेसेमिया मेजरच्या रुग्णांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण अस्थिर असते. त्यात लाल पेशी नाश पावतात. त्यामुळे शरीरातील आॅक्सिजनची कमी होऊन रुग्णांना थकवा जाणवतो. त्यामुळे वारंवार रक्त संक्रमण करावे लागते.