महागाईच्या विरोधात ‘थाळीनाद’आंदोलन
By admin | Published: October 30, 2015 12:26 AM2015-10-30T00:26:07+5:302015-10-30T00:26:07+5:30
भाजपला राज्याची सूत्रे हाती घेऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. वर्षभरात राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस : तहसीलदारांना सोपविले निवेदन
चांदूररेल्वे : भाजपला राज्याची सूत्रे हाती घेऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. वर्षभरात राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यात जीवनाश्यक वस्तुंची भाववाढ आकाशाला भिडली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे महागाईच्या विरोधात चांदूररेल्वे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरूवारी थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
डाळी, कडधान्ये, भाजीपाला आणि खाद्यतेलाच्या किंमतीत बेसुमार वाढ झालेली आहे. ती सर्वसामान्य जनतेला परवडणे अशक्य आहे. राज्यात अन्न सुरक्षा योजनेची अद्याप नीट अंमलबजावणी झालेली नाही. अशा परिस्थितीत शासनाने तातडीच्या उपाययोजना करून सर्वसामान्य जनतेला जीवनाश्यक वस्तू रास्त भावामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी काही ठोस पावले उचलावीत, अशी मागणी राकाँतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष गणेश रॉय, राकाँ अल्पसंख्याक शहराध्यक्ष समीर जानवानी, अनिल आठवले, पालिका उपाध्यक्ष श्रृतिका आठवले, नीलिमा शिरभाते, रजनी इंगोले, प्रभा कदम, रविशंकर दीक्षित, संदीप देशमुख, गजू भोयर, रमेश वाठ, अमिर पठाण, साबिरभाई, मुकेश चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)