ठाण्यातून पोलिसाचीच दुचाकी चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:32 AM2018-12-11T01:32:46+5:302018-12-11T01:33:09+5:30

शहरातील एखाद्या घरातून किंवा बाजारपेठेतून दुचाकी चोरून नेण्याच्या घटना नेहमीच प्रकाशात येतात. मात्र, चोरट्यांनी चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातून दुचाकी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला.

Thane police steal a bike | ठाण्यातून पोलिसाचीच दुचाकी चोरली

ठाण्यातून पोलिसाचीच दुचाकी चोरली

Next
ठळक मुद्देआता बोला!

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील एखाद्या घरातून किंवा बाजारपेठेतून दुचाकी चोरून नेण्याच्या घटना नेहमीच प्रकाशात येतात. मात्र, चोरट्यांनी चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातून दुचाकी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. नागपुरीगेट पोलीस ठाण्याच्या आवारातून रविवारी सायंकाळी एका पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरी गेली होती. सुदैवाने चोर सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे पोलिसांच्या हाती लागले.
पोलीस सूत्रानुसार, अब्दुल नदीम अब्दुल मजिद (रा. जमील कॉलनी, ह.मु. इमामनगर) व सलीम ऊर्फ राजू अशी आरोपींची नावे असून, अब्दुल नदीम हा नगरसेवक वसीम करोडपती यांचा भाऊ आहे. तो पसार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी सलीम ऊर्फ राजूला अटक केली आहे. बिच्छुटेकडी येथील रहिवासी वारीस अंबादास तायडे (४०) नागपुरी गेट पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असून, रविवारी त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच २७ एवाय-३०१७) नागपुरी गेट ठाण्याच्या आवारात उभी केली होती. यादरम्यान आरोपींनी संगनमत करून ठाण्याच्या आवारातून त्यांची दुचाकी लंपास केली. हा प्रकार काही वेळानंतर निदर्शनास येताच नागपुरी गेट पोलिसांनी ठाण्यातील सीसीटीव्हीची पाहणी केली. दोन इसम दुचाकी चोरताना सीसीटीव्हीत कैद झाले होते. पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवित दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना काही तासांतच अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश खुळे करीत आहेत. इतर प्रकरणांच्या वेळी पोलिसांनी अशी तत्परता दाखवावी, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही महिन्यांत दररोज शहरातील विविध ठिकाणांवरून दुचाकी लंपास करण्यात येत आहेत. महिन्याभरात दहा-पंधरा दुचाकी चोरीला गेल्या असाव्यात, अशी शंका आहे. त्या तुलनेत गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. रविवारी चक्क पोलीस ठाण्यातून आणि तीही पोलिसाचीच दुचाकी लंपास झाल्याने चोरांचे हौसले बुलंद आहे, हे लक्षात येते.

आरोपी दुचाकी चोरून नेत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. एकाला अटक केली आहे, तर दुसरा आरोपी नगरसेवकाचा भाऊ आहे. तो पसार झाला आहे. त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
- दिलीप चव्हाण, पोलीस निरीक्षक, नागपुरीगेट पोलीस ठाणे

Web Title: Thane police steal a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.