त्या तर विचित्राताई, पत्रकारांवर भडकल्यानंतर यशोमती ठाकुरांनी असं सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 05:52 PM2022-11-12T17:52:58+5:302022-11-12T17:53:49+5:30
मला प्रश्न विचारता तुम्ही न्यायालय आहात की न्यायाधीश, मी पाहीन काय करायचे ते, माझी लढाई सुरू आहे, मला शिकवू नका असे सांगत, असल्या पत्रकारांना यापुढे पत्रकार परिषदेला बोलावू नका, असे चित्रा वाघ यांनी म्हटले
मुंबई - भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांची शुक्रवारी यवतमाळमध्ये झालेली पत्रकार परिषद वादळी ठरली. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर पत्रकारांनी मंत्री संजय राठोड यांच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला. संजय राठोड यांचा विषय संपला आहे, असे तुम्ही म्हणता, मग आघाडी सरकारच्या काळात केवळ राजकीय हेतूने तुम्ही त्यांच्यावर आरोप केले का, असे विचारताच चित्रा वाघ संतापल्या. चित्रा वाघ यांनी पत्रकारांना उलटप्रश्न केल्याने आता त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही चित्रा वाघ यांना एका वाक्यात सुनावले.
मला प्रश्न विचारता तुम्ही न्यायालय आहात की न्यायाधीश, मी पाहीन काय करायचे ते, माझी लढाई सुरू आहे, मला शिकवू नका असे सांगत, असल्या पत्रकारांना यापुढे पत्रकार परिषदेला बोलावू नका, असे चित्रा वाघ यांनी म्हटले. त्यानंतर, पत्रकार परिषदही सोडली. चित्रा वाघ यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच अनुषंगाने आमदार यशोमती ठाकूर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, चित्राताईंबद्दल आपण मला कशाला प्रश्न विचारता आहात, त्या विचित्राताई आहेत, असा टोला यशोमती ठाकूर यांनी चित्रा वाघ यांना लगावला.
सध्या राज्यात हुकूमशाही - ठाकूर
सध्या राज्यात हुकूमशाही सुरू आहे की काय असं वाटतं आहे. आमच्या जिल्ह्यातही एक खासदार आहे ज्यांना कोर्टाने वॉरंट बजावलं आहे, कोर्टाने तंबी दिलेली आहे तरीसुद्धा त्यांना वाचवायचा प्रयत्न होत आहे. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना ज्याप्रमाणे अटक झाली यावर काय बोलणार इतिहासाची मोडतोड हे आरएसएस आणि भाजपवाले नेहमीच करत आलेले आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या लोकप्रतिनिधीला एखाद्या माजी मंत्र्याला एखाद्या गोष्टीला विरोध करावासा वाटतो तर त्याला अटक केली जाते.
चित्रा वाघ विदर्भ दौऱ्यावर
भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाचा चित्रा वाघ यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी विदर्भ दौरा बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या मातृतीर्थापासून सुरू केला. शुक्रवारी त्या यवतमाळात आल्या. येथील विश्रामगृहावर त्यांनी पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेत सुरुवातीला त्यांनी भाजप महिला मोर्चा महिला संघटन, महिलांचे सक्षमीकरण व महिलांविषयक शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातील निर्णयांची माहिती दिली. तर महाविकास आघाडी सरकारच्या एकूणच धोरणावर टीका करीत उद्धव ठाकरेंनाही टार्गेट केले.