बडनेरातील 'त्या' अनोळखी तरुणीची दगडाने ठेचून हत्याच !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:08 AM2024-10-18T11:08:11+5:302024-10-18T11:14:55+5:30
पीएम रिपोर्टमधून उकल : संशयिताला अटक, एक फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती/बडनेरा : मंगळवारी बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या तरुणीला हेड इंज्युरी आढळून आली. त्यातून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची बाब शवविच्छेदन अहवालावरून समोर आली आहे. त्यानुसार बडनेरा पोलिसांनी १७ ऑक्टोबर पहाटे या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली. एक आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान मृत तरुणीची ओळख अद्यापही पटली नसून त्यादृष्टीने बडनेरा पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
बडनेरा पोलिसांनुसार, शेखर ऊर्फ चंद्रशेखर नारायण चिंचोळकर (३४, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, बडनेरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावरील जुन्या वस्तीच्या बाजूने तिकीट घराशेजारी पाण्याच्या टाकीजवळ १५ ऑक्टोबर रोजी सकाळी एका तरुणीचा मृतदेह रक्तबंबाळ स्थितीत आढळून आला होता. पंचनाम्यादरम्यान बडनेरा पोलिसांना मृत तरुणीच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या होत्या. तसेच तेथे रक्ताचे डागसुद्धा दिसून आले होते. मृत तरुणी ही अनोळखी असल्याने पोलिसांनी सर्वप्रथम तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, तरुणीच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना नुकताच प्राप्त झाला. हेड इंज्युरीमुळे मृत्यू झाल्याचे त्यात नमूद असल्याने तरुणीची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तो अहवाल व साहू यांच्या बयानानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रत्यक्षदर्शीच बयाण ठरले पूरक
बडनेरा पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील पाणी बॉटल विक्रेता राजकुमार सुदर्शन साहू (३०, रा. साहू बाग, अमरावती) यांचे बयाण नोंदविले. १४ ऑक्टोबर रोजी रात्री १० च्या सुमारास आपण पाण्याच्या टाकीजवळ झोपलो होतो. अचानक मला भांडणाचा आवाज आला. उठून बघितले असता, एक अनोळखी महिला व दोन पुरुष खूप दारू पिऊन नशेत भांडण करीत होते. त्या दोघांपैकी एक शेखर होता. ते दोघे त्या महिलेला लाथाबुक्क्या व दगडांनी मारहाण करीत होते. दारूच्या नशेत असल्यामुळे आपण तेथून निघून गेलो, असे साहू यांनी सांगितले.