घरातच थाटला कुंटणखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:05 AM2017-11-29T00:05:47+5:302017-11-29T00:06:22+5:30
एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमजाळात अडकवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमजाळात अडकवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे लैंगिक संबंध जेथे प्रस्थापित झाले त्या भूमिपुत्र कॉलनीतील कुंटणखान्याचा सोमवारी पदार्फाश झाला. बलात्कार प्रकरणात कोतवाली पोलिसांनी कारवाई करीत दोघांना अटक केली. ऐहफाज अली हैदर अली (२१,रा. गौसनगर) व मनीष शामराव मार्टीन (२५,रा.भूमिपुत्र कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.
सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास एक २० वर्षीय तरुणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेली. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे कथन तिने पोलिसांसमोर केले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ व १०९ (गुन्हा करण्यास सहाय करणे) अन्वये गुन्हा नोंदविला. चौकशी सुरू करून मध्यरात्रीच आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीत कुंटणखान्याचा पदार्फाश झाला. आरोपी ऐहफाज अली हा आॅटोचालक असून तो दररोज पीडित मुलीला गोपालनगर ते श्याम चौकापर्यंत सोडून द्यायचा. ती तरुणी एका महाविद्यालयात शिकत आहे. दरम्यान आॅटोचालक ऐहफाजने पीडित मुलीचा मोबाईल क्रमांक मिळवूनन तिला प्रेमजाळात फसविले. दोघेही मोबाईलवर संभाषण करीत होते. दरम्यान एकदा ऐहफाजने तिला घरी नेले व तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगू नको, अशा धमक्या ऐहफाज दिल्यामुळे पीडितेने कुठेही याची वाच्यता केली नाही. ऐहफाजने पीडित मुलीला भूमिपुत्र कॉलनीतील रहिवासी मनीष मार्टीनच्या घरी नेले. तासभरासाठी खोली भाड्याने घेऊन ऐहफाजने पुन्हा तरुणीवर बलात्कार केला. अखेर ऐेहफाजच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून पीडितेने सोमवारी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात पीआय दिलीप पाटील, पीएसआय सुजाता बन्सोड, डीबीचे स्कॉडचे अब्दुल कलाम, गजानन ढेवले, प्रफुल्ल खोब्रागडे, विनोद भगत यांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी आरोपी ऐहफाजचा आॅटो क्रमांक एमएच २७-एफ-०४४० जप्त केला. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
५०० रुपये तास खोलीचे भाडे
मनीष मार्टीन हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल आहे. भातकुलीत घडलेल्या एका बलात्कार प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडे तीन खोल्या असून तो प्रेमीयुगुलांना ५०० रुपये तासाप्रमाणे खोली भाड्याने देत असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. मनीषने आणखी किती जणांना व कोणा-कोणाला खोली भाड्याने दिली होती. त्याने वेश्या व्यवसायासाठी खोलीचा वापर चालविल्याची शंकाही पोलिसांना आहे. त्यादिशेने पोलीस चौकशी करीत आहे.
लव्ह-जिहाद ?
बलात्कार प्रकरणातील एक आरोपी विशिष्ट समुदायातील असून त्याने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लैंगिक अत्याचार केला. त्याने आणखी काही काही मुलींना फसविल्याची शंका पोलिसांना आहे. त्यामुळे हे प्रकरण लव्ह-जिहादचे असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलीस उपायुक्त शशीकांत सातव यांनी सांगितले.
लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून दोघांना अटक केली. चौकशीनंतर एक आरोपी ५०० रुपये तासाप्रमाणे खोली भाड्याने देऊन अड्डाच चालवित असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. त्याने आणखी किती जणांची फसवणूक केली, ही बाब तपासली जाईल. त्या घराच्या दस्तऐवजांची शहानिशा करून तो अड्डा नष्ट करण्याचा प्रस्ताव तयार करू.
- शशीकांत सातव,
पोलीस उपायुक्त