युती, आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच! काँग्रेस बुरूज शाबूत राखेल की भाजप मुसंडी मारेल?
By गणेश वासनिक | Published: October 26, 2024 12:29 PM2024-10-26T12:29:39+5:302024-10-26T12:30:17+5:30
जिल्हा अमरावती गणेश वासनिक, लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : महायुती , महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच झाली असली जाहीर झालेल्या ...
जिल्हा अमरावती
गणेश वासनिक, लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : महायुती, महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच झाली असली जाहीर झालेल्या उमेदवारीवरून काँग्रेसला बुरूज शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान आहे, तर यंदा भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने आमदारांच्या संख्येत वाढ करण्याची रणनीती आखली आहे. जिल्ह्यातील आठपैकी तीन मतदारसंघ काँग्रेस, दोन प्रहार, तर भाजप, अपक्ष अन् स्वाभिमानी पक्ष असे मिळून प्रत्येकी एक, अशी संख्या आहे. जागा वाटपात भाजपवर अन्याय झाल्याचा सूर असला तरी येत्या काळात महायुती धर्म पाळला जातो का? यावरही बरेच चित्र अवलंबून असणार आहे.
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही दिवसांत भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातून दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, तर शिंदेसेनेला दर्यापूर तर अजित पवार गटानेही अमरावतीत विद्यमान आमदाराला संधी दिली आहे. महायुतीतून बडनेराची जागा युवा स्वाभिमानला जाणार आहे, तर दुसरीकडे मेळघाट, मोर्शीच्या जागेबाबत महायुती, महाविकास आघाडीत एकमत झाले नाही. महाविकास आघाडीत दर्यापूरसाठी काँग्रेस आणि उद्धवसेनेत चर्चेच्या फैरी सुरूच आहे. बडनेऱ्यात उद्धवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे. मात्र, महाविकास आघाडीतून काँग्रेसला अमरावती, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर या चार जागा मिळाल्या असून त्या सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे, तर भाजपला धामणगाव रेल्वे, अचलपूर, तिवसा, मेळघाट, मोर्शी या पाच मतदारसंघाव्यतिरिक्त मित्रपक्षाकडे असलेल्या दर्यापूर, बडनेरा, अमरावती या जागांवर नजरा लागल्या आहेत.
वंचित, बसपाचे उमेदवारही मैदानात असतील. बंडखोरांची डोकेदुखी महायुती व महाविकास आघाडीला सहन करावी लागेल, असे तूर्त चित्र आहे. मात्र कोणत्या पक्षाकडे कोणती आणि कोणत्या पक्षाकडे उमेदवार यानंतरच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.