आमला-पुलगाव आर्मी महामार्गाची केली खड्ड्यांनी चाळण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 11:54 AM2024-05-03T11:54:21+5:302024-05-03T11:55:26+5:30
Amravati : राज्य महामार्गाच्या देखभालीकडे उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा बाजार : आमला ते पुलगाव या आर्मी महामार्गाची दैनावस्था झाली आहे. संवेदनशील असलेल्या या राज्य महामार्गाच्या देखभालीकडे उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. या महत्त्वपूर्ण मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे व रस्त्याच्या कडेला वाढलेल्या खुरट्या झुडपांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
वरुड ते हातुर्णापर्यंत आर्मी महामार्ग अतिशय क्षतिग्रस्त झाला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, हे कळायला मार्ग नाही. रस्ताच हरवल्यासारखे खड्डे पडल्याने दररोज अपघात घडत असून, राष्ट्रीय महामार्ग विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसत आहे. आमला ते पुलगाव हा मिलिटरी रस्ता वरुडवरून हातुर्णामार्गे पुढे नागपूर-अमरावती या राष्ट्रीय हायवे क्रमांक ६ ला तळेगाव येथे मिळतो. या रस्त्याची दर्जोन्नती करून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. वरुड तळेगाव या महामार्गावर अतिशय खड्डे पडले असून, खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज अपघात घडतात. राजुरा बाजार ते हातुर्णापर्यंत आठ किलोमीटरपर्यंतचा रस्ता अतिशय हलाखीचा झाला असून खड्ड्यांत हरविला आहे. या रस्त्यावर निव्वळ खड्डयांचे साम्राज्य आहे. बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दखल घेत किमान डागडुजी व पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दोन वर्षांपासून डागडुजी नाही
आर्मी महामार्गाच्या दुरुस्तीबाबत यापूर्वी माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. तथापि, दोन वर्षापासून साधी डागडुजीही नाही. दिशादर्शक फलक नाही. काटेरी झुडपे रस्त्यावर आली आहेत. खड्डा चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकीचालकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
सततची वर्दळ
आमला-पुलगाव महामार्ग वरुडहून राजुरा मार्गे हातुर्णाला जातो. राजुरा बाजार हे गाव हिरव्या मिरचीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. गुरांची मोठी बाजारपेठ आहे. वर्दळीच्या दृष्टीने या मार्गाची देखभाल सातत्याने होणे गरजेचे असताना बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आतादेखील आहे. फक्त सिमेंट रोड हा एनएचएआयकडे आहे.
- ईश्वरानंद पनपालिया, अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती
आमचा नियमित रहदारीचा हा रस्ता आहे. परंतु या रस्त्याची चाळण झाल्यने अनेकांना मणक्याचे आजार जडले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेत किमान तातडीने डागडुजी व पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात यावे.
- दामोदर ताथोडे, बेलोरा (ताथोडे), ता. वरुड