जेवणादरम्यानचा वाद गेला टोकाला; मध्यस्थी करू पाहणाऱ्या जावयाला भाल्याने भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 08:21 PM2022-02-21T20:21:27+5:302022-02-21T20:22:01+5:30
Amravati News जेवणादरम्यान उद्भवलेल्या वादादरम्यान साल्यांनी जावयाला भाल्याने भोसकून ठार केले. वलगावस्थित सिकची रिसॉर्टमागील घुमंतू बेड्यावर २० फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारासही घटना घडली.
अमरावती : जेवणादरम्यान उद्भवलेल्या वादादरम्यान साल्यांनी जावयाला भाल्याने भोसकून ठार केले. वलगावस्थित सिकची रिसॉर्टमागील घुमंतू बेड्यावर २० फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारासही घटना घडली. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी मृताचे दोन साले व अन्य एक अशा तिघांविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तिनही हल्लेखोर पसार झाले आहेत. कन्हैय्या पवार (३२, रा. अकोट, ह.मु. वलगाव) असे मृताचे नाव आहे.
आरोपींमधील बिसन रघुनाथ शिंदे व राजेश रघुनाथ शिंदे हे कन्हैय्या पवारचे साले तर किसना भोसले देखील त्यांचा नातेवाईक आहे.
सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील, गुन्हे शाखा प्रमुख अर्जुन ठोसरे व वलगावचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी घटनास्थळी भेट दिली. तथा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला.
तक्रारीनुसार, अमरावतीच्या दसरा मैदान झोपडपट्टीत राहणारे शिंदे बंधू व किसना भोसले हे २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी जावई कन्हैय्या पवार याच्या वलगावस्थित बेड्यावर आले. तेथे रात्री जेवण करत असताना बिसन व राजेश या दोेन भावांमध्ये वाद झाला. कन्हैय्याची पत्नी गंगा हिने भावांना समजविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कन्हैया पवार तुमच्यामध्ये का बोलत आहे यालाच मारा, असे किसना भोसले म्हणाला. भोसले चाकुसारखे व भाल्यासमान असणारे शस्त्र बिसन शिंदेकडे दिले. तर राजेश शिंदे याने जावई कन्हैय्या याला पकडून ठेवले. तर बिसनने कन्हैय्यावर वार करून जावयाला संपविले. तीनही आरोपींनी संगनमत करून आपल्या पतीचा खून केल्याची तक्रार मृताच्या पत्नीने केली.
मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून तिच्या दोन भावांसह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पसार आरोपींना पकडण्यासाठी तपास पथके रवाना केली आहेत.
विजय वाकसे, ठाणेदार, वलगाव