‘तो’ मृत तरूण नागपूरच्या मोमिनपुऱ्याचा; आरोपींना घेऊन आला होता अमरावतीत, टॅक्सीही मिळाली
By प्रदीप भाकरे | Published: March 27, 2023 04:29 PM2023-03-27T16:29:09+5:302023-03-27T16:59:14+5:30
ओळख पटली, निघाला कॅब चालक
अमरावती : नांदगाव पेठ येथील शिवपार्वतीनगरातील लक्ष्मण शिंगणजुडे यांच्या घराच्या व्हरांड्यात दोघांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दगावलेल्या तरूणाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मृताचे नाव अजीमखान (२७, रा. मोमिनपुरा, नागपूर) असे असून, तो ओला कॅब चालक असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृताची कॅब देखील हस्तगत करण्यात आली आहे. ती कॅब नांदगाव पेठ हद्दीतील एका रस्त्याच्या कडेला कलंडलेल्या स्थितीत आढळून आली. दरम्यान, नांदगाव पेठ पोलिसांचे एक पथक नागपूरला रवाना झाले आहे.
सिनेस्टाइल पाठलाग करून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास नांदगाव पेठ येथे उघड झाली होती. पंचविशीतील अज्ञात तरुणाचा गळा निर्दयीपणे कापण्यात आला होता. मात्र मृताची
ओळख पटली नव्हती. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी २६ मार्च रोजी सकाळी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला तथा मृताची ओळख पटविण्याचे आव्हान स्विकारले.
मृताचा चेहरा, घटनास्थळी सापडलेला मृताचा शर्ट व बुट सोशल मिडियावर व्हायरल करून मृताची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले. सायंकाळपर्यंत मृताचा फोटो नागपुरच्या त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचला. त्यामुळे मृताचे मामा तसेच चुलतभाऊ आदी नातेवाईक रविवारी रात्रीच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे त्यांनी मृताची ओळख पटविली.
कॅब घेऊन आला होता अमरावतीत
नातेवाईकांनुसार, अजीमखान हा नागपूर शहरात ओला कॅब चालवित होता. शनिवारी रात्रीपर्यंत तो नागपुरात होता. मात्र त्यानंतर त्याने अमरावतीचे भाडे घेतले. दोघांना घेऊन तो अमरावतीत आला. त्याचा फोन देखील बंद असल्याने आमचा नाईलाज झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले. त्यानुसार, नांदगाव पेठ पोलिसांनी मृत अजीमखानच्या ओला कॅब (टॅक्सी)चा शोध घेतला. ती कॅब नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर महामार्गालगत उलटलेल्या स्थितीत दिसून आली. ती पोलिसांनी ठाण्यात आणली. त्यामुळे भाड्यावरून आरोपी व अजीमखानमध्ये वाद झाला असेल का, त्यातून त्याची हत्या करण्यात आली असावी का, या दिशेने पोलिसांनी तपास चालविला आहे. आरोपींनी ओला बुक केली असेल, ते लक्षात घेऊन मृताचा मोबाईल देखील तपासला जाणार आहे.
मृताची ओळख पटविण्यात यश आले. मृत नागपुरच्या मोमिनपुऱ्याचा रहिवासी होता. तथा भाडे घेऊन अमरावतीकडे आला होता, अशी प्राथमिक माहिती आहे. चार ते पाच पथके आरोपींचा शोध घेत आहे.
- सागर पाटील, पोलीस उपायुक्त