चार किलोमीटर लांब सापडला नदीत बुडालेल्या तिसऱ्या युवकाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 04:55 PM2022-09-18T16:55:39+5:302022-09-18T17:01:39+5:30
पिंगळाई नदीत शनिवारी बुडाले होते तारखेडचे तीन युवक
गजानन मोहोड, अमरावती: शहरानजीक पिंगळाई नदीमध्ये मासेमारीचे जाळे काढण्यासाठी गेलेले तारखेड येथील तीन युवक नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याची घटना शनिवारी सकाळी घडली होती. यापैकी दोघांचे मृतदेह डीडीआरएफ पथकाने शनिवारी शोधले. मात्र, सायंकाळ झाल्याने शोध थांबविला होता. त्यापैकी तिसऱ्या युवकाचा मृतदेह पथकाला घटनास्थळापासून चार किमी अंतरावर काटेरी झुडपाला अटकलेला पथकाला रविवारी आढळून आला.
बाळू नांदणे (२६) असे मृताचे नाव आहे. या घटनेतील पंकज मेश्राम (१९), अनिकेत मेश्राम (१८) या तिघांचेही मृतदेह पथकाने शोधले आहे. यावेळी तहसीलदार वैभव फरतारे स्व:ता घटनास्थळी उपस्थित होते. पथकाने मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी पोलिसांच्या स्वाधीन केला. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले आहेत. त्यामुळे मासेमारी करायला खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी केले आहे. डीडीआरएफ पथकामध्ये दीपक पाल, देवानंद भुजाडे, विशाल निमकर, भूषण वैद्य, गणेश जाधव, योगेश ठाकरे, राजेंद्र शाहाकार,दीपक चिल्लोरकर आदींचा सहभाग होता.