बोगस डॉक्टर अडकला पंचायत समिती पथकाच्या कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 03:05 PM2024-06-28T15:05:38+5:302024-06-28T15:06:14+5:30

Amravati : पदवी बनावट, ओपीडी रजिस्टर नाही, अॅलोपॅथीचा सर्रास वापर

The bogus doctor got stuck in the panchayat samiti team | बोगस डॉक्टर अडकला पंचायत समिती पथकाच्या कचाट्यात

The bogus doctor got stuck in the panchayat samiti team

अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क 
परतवाडा :
'झोलाछाप' हे विशेषण ज्यांच्यासाठी वापरले जायचे, अशा बोगस डॉक्टरांचे माहिती-तंत्रज्ञानाचे दालन एका क्लिकवर असलेल्या या युगातही फावले असल्याचे मोठ्या लोकसंख्येच्या अचलपुरात उघडकीस आले आहे. शहरात मागील दीड ते दोन वर्षापासून प्रॅक्टिस करीत असलेल्या बोगस डॉक्टरची गुरुवारी अचलपूर पंचायत समितीच्या पथकाने पोलखोल केली. त्याच्याकडील पदवी बोगस आहे. ओपीडी रजिस्टर नावालाही नाही. अॅलोपॅथीच्या औषधांचा सर्रास वापर करणाऱ्या या डॉक्टरकडून त्याने फलकावर नमूद केलेल्या शस्त्रक्रियेसंबंधी अवजारे दाखविण्यास नकार देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 

पथकाच्या माहितीनुसार, पी. के. मंडल असे या कथित वैद्यकीय व्यावसायिकाचे नाव आहे. अचलपूर पोलिसांकडून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना संबंधित डॉक्टरच्या चौकशीकरिता पत्र प्राप्त झाले. या पत्राच्या अनुषंगाने अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर अरबट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल सुरेश दहीकर, विस्तार अधिकारी सुधाकर पवार यांनी अचलपूर शहरातील बिलनपुरास्थित पाताळेश्वर मंदिरासमोरील झेंडा चौकातील पी. के. मंडल याच्या दवाखान्यात गुरुवारी धडक दिली.


अचलपूर तालुक्यातील चाचोंडी येथील शरद वसंतराव पेढेकर (३०) यांनी अचलपूर पोलिस ठाण्यात १४ जून रोजी पी. के. मंडल याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यांचे वडील वसंतराव नामदेवराव पेढेकर यांच्यावर मूळव्याधीच्या अनुषंगाने त्याच्याकडून उपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे त्यांना परतवाडा येथील दोन खासगी डॉक्टरांकडे उपचारार्थ नेले आणि प्रकृती खालावल्यामुळे अमरावती  येथील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे पी. के. मंडल याच्याविरुद्ध तक्रार देत त्याच्या वैद्यकीय पार्श्वभूमीची चौकशी करण्याची मागणी केली होती.


डॉक्टरकडे असलेली पदवी बनावट असल्याचे चौकशी पथकाच्या निदर्शनास आले. अॅलोपॅथी औषधी वापरण्याचे, हाताळण्याचे ज्ञान नसताना तो ते हाताळत असल्याचे आढळले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे कुठलेही ओपीडी रजिस्टर आढळून आले नाही. केवळ कुठल्या रुग्णाकडून किती रुपये घेतले याच्या नोंदी असलेली नोंदवही आढळून आली. शस्त्रक्रियेची शस्त्रे दाखविण्यास चौकशी पथकाला त्याने नकार दिला. पथक चौकशीच्या अनुषंगाने अहवाल अचलपूर पोलिस ठाण्यात सादर करणार आहे. या अहवालाच्या अनुषंगाने अचलपूर पोलिस संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.


संबंधित डॉक्टरच्या दवाखान्याला भेट देऊन चौकशी केली. उपलब्ध माहितीवरून या प्रकरणातील अहवाल तयार करून तो पोलिसांकडे पाठविला जाईल. पोलिस पुढील कारवाई करतील. 
- डॉ. किरण शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, अचलपूर

Web Title: The bogus doctor got stuck in the panchayat samiti team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.