परतवाड्यात लग्नाचा करारनामा; वर-वधूने लग्नमंडपी केली करारनाम्यावर स्वाक्षरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 12:49 PM2023-03-18T12:49:55+5:302023-03-18T12:54:52+5:30
साक्षीदारही उपस्थित; नात्यातील गोडवा जपण्याचा हा प्रयत्न चर्चेत
अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : विवाहप्रसंगी लग्नमंडपी वर-वधूने परतवाड्यात लग्नाच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करून नात्यातला गोडवा जपण्याची हमीच पाहुणे मंडळींना दिली.
आमच्यात वादविवाद झाले तरी आमचे आम्हीच ते एक दिवसात मिटवू, अशी ग्वाही वर-वधूने या करारनाम्यात दिली आहे. मी शॉपिंगसाठी हट्ट धरणार नाही. वराचे मित्र घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल, असे वधूने करारनाम्यात मान्य केले. दुसरीकडे वधूचे म्हणणे नेहमी बरोबरच असेल. मी हिची आणि आई-वडिलांची सेवा करेल, असे वराने मान्य केले आहे.
अचलपूर येथील दीपक रामभाऊ काशीकर यांची कन्या कस्तुरी आणि अमरावती येथील नारायणराव शंकरराव बाराहाते यांचा मुलगा पीयूष यांचा विवाह १३ मार्च रोजी परतवाडा-अमरावती मार्गातील मंगल कार्यालयात झाला. या विवाह सोहळ्यात लग्नमंडपी हा करारनामा दर्शनी भागात बघायला मिळाला.
अचलपूरच्या इतिहासातील हा असा पहिलाच करारनामा ठरला आहे. दोन्ही पक्षाकडील पाहुणे मंडळींकरिता तो लक्षवेधक ठरला. या करारावर कस्तुरी आणि पीयूष या दोघांनीही पाहुणे मंडळींच्या साक्षीने स्वाक्षऱ्या केल्यात. साक्षीदारही याप्रसंगी हजर झाले आणि नात्यातील गोडवा जपण्याचा हा प्रयत्न चर्चेत आला.