येणी शिवारात प्रेमीयुगुलाच्या विवाहबाह्य संबंधाचा क्रूर शेवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 05:00 AM2022-02-24T05:00:00+5:302022-02-24T05:00:49+5:30
जमिनीवर रिंग होत असलेला मोबाईल ठाणेदारांनी उचलला. पलीकडून उत्तर आले, माझ्या पतीचा हा मोबाईल आहे. त्यांचा मृतदेह माझ्यापुढे आहे आणि सोबत महिला आहे, हे ठाणेदारांनी सांगताच दोघांचेही नावे फोनवरून सांगण्यात आली आणि या प्रकरणाचे कोडे सुटले. प्रेमीयुगुलाच्या विवाहबाह्य संबंधाचा क्रूर शेवट झाला. प्राथमिक तपासात सुधीर बोबडे याने बाहुपाशात असलेल्या महिलेची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. ताफा येणी पांढरी शिवारात एका शेतातील शेडमध्ये पोहोचला. डोळ्यासमोर दृश्य थक्क करणारे होते. जमिनीवर रिंग होत असलेला मोबाईल ठाणेदारांनी उचलला. पलीकडून उत्तर आले, माझ्या पतीचा हा मोबाईल आहे. त्यांचा मृतदेह माझ्यापुढे आहे आणि सोबत महिला आहे, हे ठाणेदारांनी सांगताच दोघांचेही नावे फोनवरून सांगण्यात आली आणि या प्रकरणाचे कोडे सुटले. प्रेमीयुगुलाच्या विवाहबाह्य संबंधाचा क्रूर शेवट झाला. प्राथमिक तपासात सुधीर बोबडे याने बाहुपाशात असलेल्या महिलेची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात येईल, मात्र तो नेमका कुणाविरुद्ध, ते सद्यस्थितीत सांगता येणार नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले.
परतवाडा-अकोला मार्गावरील येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतातील कृषिसाहित्य ठेवण्यासाठी बांधलेल्या शेडमध्ये बुधवारी सकाळी १० वाजता उघड झालेल्या घटनेत चायना चाकूचा वापर करण्यात आला. सुधीर रामदास बोबडे (५२, रा. वनश्री कॉलनी, कांडली) व ४८ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. बँकेत जात असल्याचे सांगून महिला मंगळवारी दुपारी २ पासून घरातून बाहेर पडली. कुटुंबीयांनी वारंवार मोबाईलवर संपर्क केला, परंतु प्रतिसाद दिला नाही. रात्री उशिरा बेपत्ता असल्याची तक्रार परतवाडा पोलिसात देण्यात आली होती. एसपी अविनाश बारगळ यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, एसडीपीओ गौहर हसन, ठाणेदार संतोष ताले, उपनिरीक्षक देवेंद्र मेसकर, धीरज गुल्हाने, आतिश शेख, चंद्रकांत बोडसे, नाझिम शेख, नीलेश काळे, जय मेटांगे आदींनी घटनास्थळ गाठले.
दरम्यान, सुधीर बोबडेवर बुधवारी अंत्यसंस्कार झाले. महिलेची उत्तरीय तपासणी झालेली नव्हती.
सुधीरविरुद्ध हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा?
सुधीरने चायना चाकूने महिलेच्या पोटात, गळ्यावर वार केले. यानंतर स्वतःच्या पोटात व गळ्यावर वार करून जीवन संपविले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. मृतांच्या नातेवाइकांच्या बयानानंतर व प्राथमिक शवविच्छेदन अहवालानंतरच प्रकरणातील वास्तव कळू शकेल.
फॉरेन्सिक टीम, पंचनामा, शवविच्छेदन
तपासातील मुद्दे सुटू नये, यासाठी अमरावती येथून पाच जणांची फॉरेन्सिक टीम बोलावली होती. त्यांच्या चौकशीनंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
मेल्यानंतरही डोळ्याला चष्मा, हाती चाकू
घटनास्थळी मृतांच्या डोळ्याला चष्मा, पायात चप्पल-मोजे आहेत. दोघांच्या हातात एकच चाकू आहे. झटापटीच्या कुठेच खुणा नाहीत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांचे हात रक्ताने माखले आहेत. मुठा बांधलेल्या आढळल्या. दोघांशिवाय तिसरा कोण, यावर आता मृत महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीमुळे पुढे आले आहे. त्यापूर्वी दोघांनी सोबत जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याची कुजबुज या प्रकरणाच्या अनुषंगाने पसरली होती.
दुचाकीने घटना उघडकीस
सुधीर बोबडे याने त्याच्या दुचाकीने अलका दोडके यांना घटनास्थळी घेऊन गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले. मंगळवारी दुपारपासून ही दुचाकी तेथेच उभी होती. त्यावरून परिसरातील काही नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी पर्स, मोबाईल, चायना चाकू व इतर साहित्य पंचनामा करून जप्त करण्यात आले.
दोघांचे विवाहबाह्य संबंध कुटुंबीयांना माहिती होते. महिला बेपत्ता झाल्याची तक्रार मंगळवारी दाखल आहे. पतीकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.
- संतोष ताले,
ठाणेदार, परतवाडा