अमरावतीत २१ एप्रिलनंतरच फुटणार प्रचाराचा नारळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 05:02 PM2023-04-04T17:02:59+5:302023-04-04T17:03:39+5:30
चिखलदरा तालुका वगळता सर्वच तालुक्यातील राजकारण सध्या बाजार समिती निवडणुकीसाठी ढवळून निघाले आहे.
अमरावती : जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांची निवडणुकीसाठी विहित मुदतीत १२१९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. आता २० एप्रिलपर्यत अमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. दरम्यानच्या काळात पॅनलची जुळवणूक होऊन २१ एप्रिलच्या चिन्ह वाटप प्रक्रियेनंतरच उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
चिखलदरा तालुका वगळता सर्वच तालुक्यातील राजकारण सध्या बाजार समिती निवडणुकीसाठी ढवळून निघाले आहे. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका दोन टप्प्यात होत आहे. यामध्ये २८ एप्रिल रोजी सहा व ३० ला सहा अशा एकूण १२ बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे अमरावती वगळता ११ बाजार समित्यांची मतमोजणी मतदानाचे पश्चात लगेच होणार आहे.
उमेदवारी अर्जाचा २७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यानचा टप्पा आटोपला आहे. बुधवारी छाननी व त्यानंतर २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्जाची माघार घेता येणार आहे. नेमके याच कालावधीत सहकारात मोठी घालमेल होणार आहे. यामध्ये कोणते गट कोणासोबत बसतात व प्रचाराचा नारळ फोडतात, याकडे सहकाराचे लक्ष लागले आहे.