लाल तोंडाच्या माकडाची विदेशात तस्करी प्रकरण विधिमंडळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2022 03:03 PM2022-07-01T15:03:52+5:302022-07-01T15:14:22+5:30
‘लोकमत’ने २३ मे २०२२ रोजी ‘लाल तोंडाच्या माकडाची विदेशात होतेय तस्करी’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर वन विभागातील यंत्रणा सजग झाली.
अमरावती : लाल तोंडाच्या माकडाची (लंगूर) विदेशात तस्करी होत असल्याचे प्रकरण राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजणार आहे. यासंदर्भात राज्याच्या वन विभागाने कोणत्या उपाययाेजना केल्यात, याविषयी विधानमंडळ सचिवांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना २८ जून रोजी पत्र पाठवून माहिती मागविली आहे. याप्रकरणी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न क्रमांक १३९१४ दाखल झाला आहे.
डब्ल्यूसीसीबी ही संस्था सीबीआयच्या समकक्ष असून, भारतातून विदेशात होणाऱ्या वन्यजीवांच्या तस्करींवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. त्याअनुषंगाने डब्ल्यूसीसीबीच्या अतिरिक्त संचालक तिलोत्तमा वर्मा यांनी भारतातील सर्व प्रधान मुख्य वनसंरक्षकांना ५ मे २०२२ रोजी एका पत्राद्वारे लालतोंड्या माकडांच्या तस्करीसंदर्भात अलर्ट केले.
धक्कादायक! लाल तोंडाच्या माकडाची विदेशात तस्करी, अमेरिकेत संशोधनाची मोठी मागणी
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कक्षेत येणाऱ्या लाल तोंडाच्या माकडावर लॅबोरेटरी कार्पोरेशन ऑफ अमेरिका येथे संशोधन करण्यात येत आहे. त्यामुळे भारतातील लाल तोंडाच्या माकडाची मागणी वाढली आहे. लाल माकडांचे वास्तव्य असलेल्या भागात विशेष लक्ष देण्याच्या सूचना वन विभागाला देण्यात आल्या आहेत. विधानमंडळ सचिवालयाचे सिद्धेश सावडेकर यांच्या पत्रानुसार राज्याच्या वन विभागात लाल तोंडाच्या माकडांची कुठे-कुठे तस्करी झाली, आरोपींची संख्या, आरोपींची पार्श्र्वभूमी, तस्करी रोखण्यासाठीच्या उपाययोजना आदींची माहिती मागविली आहे.
'लोकमत'ने वेधले लक्ष
‘लोकमत’ने २३ मे २०२२ रोजी ‘लाल तोंडाच्या माकडाची विदेशात होतेय तस्करी’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर वन विभागातील यंत्रणा सजग झाली. एवढेच नव्हे, तर दिल्लीच्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने (डब्ल्यूसीसीबी) लाल तोंड्या माकडाची अमेरिकेत संशोधनासाठी मागणी वाढल्याचे देशभरात अलर्ट केले होते.