अमरावती महापालिकेत उच्चाधिकाऱ्यांचे वर्तुळ पूर्ण, आता हवेत ‘ईओ’
By प्रदीप भाकरे | Published: April 18, 2023 01:12 PM2023-04-18T13:12:57+5:302023-04-18T13:14:22+5:30
मुख्यलेखापरिक्षकही एप्रिलअखेर निवृत्त : पाचही सहायक आयुक्त प्रभारी
अमरावती : उपायुक्तपदी जुम्मा प्यारेवाले यांची नियुक्ती करून नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनातील पहिल्या रांगेतील उच्चाधिकाऱ्यांचे वर्तुळ पूर्ण केले आहे. महापालिकेला अनेक वर्षानंतर अतिरिक्त आयुक्त व दोन्ही उपायुक्त एकाचवेळी लाभले आहेत. प्यारेवाले यांच्यासह उपायुक्त प्रशासन म्हणून मेघना वासनकर व अतिरिक्त आयुक्त म्हणून देविदास पवार कार्यरत आहे. शहर अभियंता कार्यरत असल्याने आता केवळ शिक्षणाधिकारी तेवढे प्रतिनियुक्तीचे हवे आहेत.
चार वर्षांपूर्वी विनायक औगड यांच्या निवृत्तीने महापालिकेत उपायुक्तपदी प्रभारराज निर्माण झाले. औगड यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर नगरविकास विभागाने अधिकारी न पाठविल्याने त्या पदाचा प्रभार महापालिकेतील पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख यांच्याकडे गेला. तर विजय खारोटे यांची बदली झाल्याने सामान्य उपायुक्तपद देखील रिक्त झाले. तेथे देखील अधिकारी पाठविण्यात न आल्याने ते पद महिला व बालविकास अधिकारी नरेंद्र वानखडे यांना देण्यात आले.
पुढे दोन वर्षानंतर सुरेश पाटील हे प्रतिनियुक्तीचे अधिकारी उपायुक्त प्रशासन म्हणून रूजू झाले. तर सामान्य उपायुक्तपदी देखील रवी पवार हे प्रतिनियुक्तीचे अधिकारी आले. मात्र ते देखील सहाच महिन्यात बदलीवर गेल्याने पुन्हा उपायुक्त सामान्य पद रिक्त झाले. ते पद पुन्हा नरेंद्र वानखडे यांना देण्यात आले. मध्यंतरी तेथे तीन महिन्यांसाठी अमित डेंगरे यांनी देखील जबाबदारी सांभाळली. तर, गेल्या एक वर्षांपासून तो पदभार वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नैताम यांच्याकडे आहे. दरम्यान सुरेश पाटील हे निवृत्तीच्या आधी मुळ विभागात गेल्याने उपायुक्त प्रशासन पदाचा प्रभार मुळच्या सहायक आयुक्त भाग्यश्री बोरेकर यांना देण्यात आला. मात्र, त्याही वैद्यकीय रजेवर गेल्याने काही काळ त्या पदाकडील विभाग अतिरिक्त आयुक्तांकडे देण्यात आले होते.
दरम्यान, उपायुक्त प्रशासनपदी शासनाने मुख्याधिकारी ‘अ’ संवर्गातील मेघना वासनकर यांच्या रूपाने प्रतिनियुक्तीचा अधिकारी दिला. तर त्यापूर्वी हर्षल गायकवाड यांच्या बदलीने रिक्त झालेल्या अतिरिक्त आयुक्तपदी देविदास पवार रूजू झाले. तर मंगळवारी जुम्मा प्यारेवाले रूजू झाल्याने आयुक्तांसह चारही उच्चाधिकाऱ्यांचा कोरम अनेक वर्षानंतर पूर्ण झाला.
३० एप्रिल रोजी ऑडिटर निवृत्त
प्रिया तेलकुंटे यांची बदली झाल्याने राम चव्हान हे मुख्य लेखापरिक्षक म्हणून रूजू झालेत. ते ३० एप्रिल रोजी नियत वयोमानाने निवृ्त्त होत आहेत. त्यामुळे ते पद देखील रिक्त होणार आहे. मात्र लेखा विभागातील मुख्य लेखाधिकारी व मुख्यलेखापरिक्षक़ ही पदे अत्यंत महत्वाची व गॅझेटेड ऑफिसर्सची पदे असल्याने शासन ती रिक्त ठेवत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे ३० एप्रिलनंतर लगेचच नवे ऑडिटर मिळण्याचे संकेत आहेत. तर पाचही सहायक आयुक्त प्रभारी असल्याने तेथे देखील अधिकारी द्यावेत, असा पाठपुरावा आयुक्तांनी चालविला आहे.