विमा कंपनीचे आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले; ४१ मंडळांतील सोयाबीनच्या अग्रिमसाठी अंतिम आदेश जारी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 17, 2023 07:43 PM2023-10-17T19:43:25+5:302023-10-17T19:43:36+5:30
जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पीक विमा कंपनीद्वारा नोंदविलेले आक्षेपाचे खंडन केले व जिल्हाधिकाऱ्यांनी ते ग्राह्य धरले आहेत.
अमरावती : ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे ४१ महसूल मंडळांतील सोयाबीनचे ५० टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचा २५ टक्के अग्रिम मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी २१ सप्टेंबरला अधिसूचना काढली होती. यावर पीक विमा कंपनीने नोंदविलेले आक्षेपाचे कृषी विभागाने खंडन केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १६ ऑक्टोबरला अंतिम आदेश जारी केले.
पावसाच्या खंडामूळे सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास संभाव्य पीक विमा भरपाईच्या तुलनेत २५ टक्के अग्रिम देण्याची तरतूद पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आहे. त्यामुळे कंपनी सर्व्हेअरला सोबत घेत कृषी विभागाने रॅन्डमपणे गावे निवडून संयुक्त सर्व्हे केला होता. यानंतर जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना निर्गमित केली होती. यावर २६ सप्टेंबरला कंपनीद्वारा आक्षेप नोंदविण्यात आले.
जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पीक विमा कंपनीद्वारा नोंदविलेले आक्षेपाचे खंडन केले व जिल्हाधिकाऱ्यांनी ते ग्राह्य धरले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी १६ ऑक्टोबरला अंतिम आदेश जारी केले आहेत व पीक विमा कंपनीला ते बंधनकारक राहणार आहे.