अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी अस्वच्छतेविषयी संबंधितांना खडसावले
By प्रदीप भाकरे | Published: July 11, 2024 06:08 PM2024-07-11T18:08:09+5:302024-07-11T18:09:02+5:30
आयुक्त सचिन कलंत्रे : ऑटो गल्ली, राजकमल चौक, ऑक्सिजन पार्क, नवसारी, अंबा नाला परिसरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी
प्रदीप भाकरे
अमरावती : महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी ११ जुलै रोजी सकाळी शहरातील ऑटो गल्ली, राजकमल चौक, ऑक्सिजन पार्क, नवसारी, अंबा नाला, गाडगेनगर रोड परिसरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. तथा स्वच्छतेत हाराकिरी सहन करणार नाही, अशी प्रशासकीय तंबी संबंधितांना दिली. स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेत त्यांनी हजेरी बुकांची तपासणी केली.
स्वास्थ निरीक्षक, सफाई कामगार व घंटागाडी कर्मचाऱ्यांशी चर्चा करत स्वच्छता करतांना रस्त्याचे साईड पट्टी आणि मोकळ्या भूखंडांची देखील स्वच्छता करण्यात यावी, अशी सक्त सूचना त्यांनी केली. पाहणीदरम्यान अनेक भागात त्यांना ठिक ठिकाणी कचरा जमा असल्याचे आढळून आले. तो परिसर स्वच्छ करुन त्वरित तो कचरा घंटागाडीत टाकण्याबाबत निर्देश दिले. मार्केट परिसरात स्वच्छतेप्रमाणेच प्रत्येक विक्रेत्यांकडे ओला व सुका कच-यासाठी हिरवा व निळा डबा असलाच पाहिजे, असे निर्देश देऊन मार्केट जवळील कंपोस्ट पिट्स व्यवस्थितरित्या कार्यान्वित राहतील याकडेही बारकाईने लक्ष देण्याच्या तसेच कोणाकडेही प्लास्टिक पिशवी असताच कामा नयेत, असा कडक इशारा आयुक्तांनी दिला.
हयगय नकोच, अन्यथा कारवाई
साफ सफाईच्या कामात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, अशी तंबी देत संपुर्ण परिसर, नाले १०० टक्के साफ झाले पाहिजेत, रोड साईडला गवत दिसायला नको, दुभाजक स्वच्छ असावेत. शहरातील विविध भागात त्यांना नारळ पडलेले दिसले. अशा हातगाडयांवर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले. या पाहणी दरम्यान स्वास्थ अधिक्षक श्रीकांत डवरे, स्वास्थ निरीक्षक, मनपा कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छतेसाठी असे दिले निर्देश
१) परिसर, नाले १०० टक्के साफ झाले पाहिजेत.
२) शहरातील दुभाजकाची साफ सफाई करा.
३) ओला व सुका कच-यासाठी हिरवा व निळा डबा अनिवार्य
४) मार्केटजवळील कंपोस्ट पिट्सचे व्यवस्थित कार्यान्वयन
५) रस्त्याच्या साईड पट्टी, मोकळ्या भूखंडांची देखील स्वच्छता
ऑक्सिजन पार्कसमोर आता सुरक्षारक्षक
ऑक्सिजन पार्कसमोरील मोकळ्या जागेला अलिकडे मिनी डंम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप आले आहे. तेथील वृत्तांत ‘लोकमत’ने सचित्र प्रसिध्द केला होता. त्याची दखल घेत आयुक्तांनी गुरूवारी ऑक्सिजन पार्कसमोरील त्या जागेची, तेथील अस्वच्छतेची पाहणी केली. त्या जागेवरील कचऱ्याचे सपाटीकरण करून तेथे कुणीही मलब्याचा ट्रक खाली करू नये, यासाठी तेथे सुरक्षारक्षक नेमण्याची सुचना करण्यात आली. तर, त्या परिसरात येथे कचरा टाकू नये, असे फलक देखील लागणार आहे.