बाधित ७७ टक्के शेतकऱ्यांचे अर्ज पीक विमा कंपनीने फेटाळले
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 24, 2023 04:50 PM2023-03-24T16:50:24+5:302023-03-24T16:54:18+5:30
अवकाळी पावसासह गारपिटीचे नुकसान, कंपनीची मनमानी सुरूच
अमरावती : जिल्ह्यात १९ ते १९ मार्चदरम्यान झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने साडेतीन हजार हेक्टरमधील शेती, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक आपत्तीसह काढणीपश्चात रबी पिकांचे नुकसान झालेल्या ३,४७८ शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या. यापैकी २,४९८ म्हणजेच ७७ टक्के अर्ज कंपनीने नाकारले आहे.
जिल्ह्यात पीक विमा कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. गतवर्षीच्या खरिपातील १४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला असताना कंपनीने अद्याप परतावा दिलेला नाही. आता अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू, हरभरा पिकाचे नुकसान झालेले आहे. याशिवाय सवंगणी केल्यानंतर बहुतेक शेतकऱ्याचे काढणीपश्चातही नुकसान झाले आहे. या दोन्ही आपत्तीसाठी पीक विम्याचा परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे.
अवकाळीसह गारपीट; ९१२ गावांतील २१ हजार हेक्टरला फटका
यासाठी बाधित ३४७८ शेतकऱ्यांनी नुकसानीचे ७२ तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी २८४७ अर्ज विविध कारणांनी कंपनीद्वारा नाकारण्यात आलेले आहेत. फक्त ६३१ अर्ज कंपनीद्वारा स्वीकारण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.