आंतरराज्य महामार्गावरील वन विभागाचा बहिरम नाका अंधारात; सीसीटीव्ही कॅमेरे बनले शो-पीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 05:00 AM2022-03-23T05:00:00+5:302022-03-23T05:01:03+5:30
आंतरराज्य महामार्गावरील वन विभागाचा हा बहिरम नाका महत्त्वपूर्ण असून, या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये वनरक्षक आपल्या ड्युटीवर असतात. सागवान लाकडासह तेंदूपत्ता व अन्य वन उपजची मोठ्या प्रमाणात या नाक्यावरून वाहतूक होते. बदली टिपी पासही याच नाक्यावर बदलविल्या जाते. अवैध सागवान लाकडाची तस्करीही या नाक्यावरूनच होते. अवैध गुटखा व बनावट दारूचीही याच नाक्यावरून वाहतूक होते.
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : बैतुल-परतवाडा आंतरराज्य महामार्गावरील वन विभागाचा बहिरम नाका मागील १० दिवसांपासून अंधारात आहे. थकीत वीज बिलापोटी वीज वितरण कंपनीने येथील विद्युत पुरवठा खंडित केला आहे.
३ हजार रुपयाचे वीज बिल भरायला परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे पैसे नसल्यामुळे ही नामुष्की ओढवली आहे. यापूर्वीही बहिरम नाक्याचा वीज पुरवठा जवळपास दोन ते अडीच महिने वीज वितरण कंपनीकडून खंडित करण्यात आला होता.
आंतरराज्य महामार्गावरील वन विभागाचा हा बहिरम नाका महत्त्वपूर्ण असून, या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये वनरक्षक आपल्या ड्युटीवर असतात. सागवान लाकडासह तेंदूपत्ता व अन्य वन उपजची मोठ्या प्रमाणात या नाक्यावरून वाहतूक होते. बदली टिपी पासही याच नाक्यावर बदलविल्या जाते. अवैध सागवान लाकडाची तस्करीही या नाक्यावरूनच होते. अवैध गुटखा व बनावट दारूचीही याच नाक्यावरून वाहतूक होते.
अशा या नाक्यावर अमरावती प्रादेशिक वन विभागाकडून परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्र अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत; पण मागील काही दिवसांपासून नाक्यावरील वीज पुरवठा खंडित असल्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. ते केवळ शोपीस ठरले आहेत.
महिला राज
बहिरम नाक्यावर आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये तीन वनरक्षक कार्यरत असतात. आज या नाक्यावर तीनही शिफ्टमध्ये महिला वनरक्षक आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा सामना त्यांना करावा लागत आहे. बरेचदा या नाक्यावर वन कर्मचारी बघायला मिळत नाहीत. अनेकदा केवळ वनमजूर या नाक्यावरील कामकाज सांभाळताना दिसतात.
वास्तूंची पडझड
बहिरम नाक्याच्या अनुषंगाने चेक पोस्ट लगत लाखो रुपये खर्च करून वन विभागाने शासकीय निवासस्थान व कार्यालय काही वर्षांपूर्वी उभारले; पण या वास्तूचा वन विभागाला चक्क विसर पडला. या वास्तूच्या खिडक्यांची तावदाने फुटली. वास्तूची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पाण्याच्या व्यवस्थेकरिता उभारल्या गेलेला हॅण्डपंपही दुर्लक्षिल्या गेला.
सोयी-सुविधांचा अभाव : या नाक्यावर आवश्यक त्या सोयी-सुविधांचा अभाव आहे. वन कर्मचाऱ्यांकरिता त्या ठिकाणी राहण्यास योग्य असे कुठलेही शासकीय निवासस्थान नाही. विश्रामाकरिता विश्रामगृहही नाही.