येथे नवस बोलणाऱ्याला बांधले जाते आडव्या खांबाला; आगळीवेगळी मेघनाथ यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 11:10 AM2023-03-10T11:10:08+5:302023-03-10T11:15:02+5:30
आदिवासी आजही जपतात आपली परंपरा
नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : आदिवासींचा सर्वांत मोठा सण होळीनिमित्त पाच दिवस फगव्याची धूम सुरू असतानाच होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवसापासून मेघनाथ यात्रेला प्रारंभ झाला आहे. तालुक्यात जेथे आठवडी बाजार भरतो, तेथे ही यात्रा भरते.
मेघनाथ यात्रा बुधवारी जारिदा, तर गुरुवारी काटकुंभ येथे भरली. शेकडो आदिवासींनी रुढीप्रमाणे मेघनाथ यात्रेत पूजाअर्चा करीत यात्रेत नवस फेडले. पान- विड्याच्या दुकानांसह इतरही वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली होती. रावणपुत्र मेघनाथच्या नावाने मेळघाटात आजही वंशपरंपरागत यात्रा भरते. जारिदा व काटकुंभ येथे परिसरातील डोमा, काजलडोह, बामादेही, बगदरी, कनेरी, कोयलारी, पाचडोंगरी, खंडुखेडा, चुनखडी, खडीमल, माखला, गंगारखेडा, कोटमी, दहेंद्री, पलस्या, बुटीदा, चुरणी, कोरडा, कालीपांढरी आदी ५० ते ६० गावांतील आदिवासी व गैरआदिवासींनी यात्रेत हजेरी लावली.
खांबाला बांधून प्रदक्षिणा, शेकडो नारळ फुटले
ज्यांनी नवस कबूल केला, तो पूर्ण झाल्यानंतर मेघनाथबाबाजवळ बसलेल्या भूमकाकडे पूजा- अर्चा केली जाते. तेथे ऐपतीप्रमाणे आडव्या खांबाला नवस कबूल करणाऱ्यास बांधले जाते. खाली दोन इसम त्या दोरीच्या साहाय्याने सहा प्रदक्षिणा घालतात. तीन वेळा सरळ व तीन वेळा विरुद्ध दिशेने प्रदक्षिणा घातल्या जातात. नवसफेड करून पूजेची समाप्ती केली जाते.
भूमकाचा पगडा भारीच
गावातील मांत्रिक अर्थात भूमकाचा पगडा यात्रेवर असतो, पान- विड्यात लग्न, ढोल-ताशे, नगारे, डफली, ताशे वाजवित गदली नृत्याने यात्रेची रंगत वाढविली जाते. बगदरी, काजलडोह, कोटमी, कोयलारी, पलासपानी येथील पथक यात सहभागी होतात.
नेत्यांची हजेरी
मेळघाटात होळी सणाच्या आदिवासींच्या परंपरागत उत्सवात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. काँग्रेसचे राहुल येवले, सहदेव बेलकर यांच्यासह प्रहार, भाजपचे पदाधिकारीही यात्रेत सहभागी झाले होते.