जिल्हा परिषदेत शिक्षक बदल्यांचा 'डबल गेम' शिक्षकांमध्ये वाढला रोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:06 IST2025-04-03T14:04:08+5:302025-04-03T14:06:08+5:30
बदली आदेशानंतर पुन्हा बदल्यांसाठी प्रक्रिया : मुख्यकार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांचे वेधले अन्यायग्रस्त शिक्षकांनी लक्ष

The 'double game' of teacher transfers in the Zilla Parishad has increased anger among teachers.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सन २०२३-२४ या वर्षात जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामध्ये बदली झालेल्या शिक्षकांना बदलीचे ऑनलाईन आदेशही मिळाले आहेत. असे असताना पुन्हा सन २०२४-२५ या वर्षातील शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या बदली प्रक्रियेत पुन्हा याच शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रवृत्त केले जात आहे. शिक्षण विभागाच्या या दुटप्पी धोरणाविरोधात मंगळवारी अन्यायग्रस्त शिक्षकांनी जिल्हा परिषद सीईओंकडे धाव घेत हा अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रिया २०२५ला प्रारंभ झाला आहे. परंतु, ही प्रक्रिया राबविण्यापूर्वीच यंदाच राबविलेल्या बदली प्रक्रियेत ऑनलाईन बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या बदल्या शिक्षकांना मान्य आहेत. सदर बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शाळेत जाण्यासाठी अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही. असे असताना आता पुन्हा सुरू केलेल्या ऑनलाईन बदली झालेल्या शाळा दाखवून याच वर्षी पुन्हा बदली प्रक्रियेत भाग घेण्यास या शिक्षकांना प्रवृत्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नुकतीच पूर्ण होत असलेली बदली प्रक्रिया ही अमरावती जिल्ह्यासाठीच राबविण्यात आलेली आहे.
इतर जिल्ह्यात ही राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे आता सुरू होत असलेली बदली प्रक्रिया ही अमरावती जिल्हा वगळून व्हावी व ऑनलाईन बदली प्रक्रिया २०२५ मध्ये वगळण्यात येऊन अन्याय दूर करावा, अशी मागणी सीईओंकडे तुळशीदास धांडे, राधा मोहोड, मंजुश्री मांजरे, महेंद्र फुके, संगीता मंडे, सुरेश ठाकूर, विजय पुसलेकर, प्रकाश बावनकुये, वर्षा धुळे व शिक्षकांनी केली.
एकाच वर्षी दोनवेळा बदल्या कशा?
काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण होत असताना आता पुन्हा बदली झालेल्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत सहभागी करण्यात येत आहे. त्यामुळे एकाच वर्षात दोनदा शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया कशी, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.