राज्याचे पहिले मराठी विद्यापीठ यंदा जूनपासून सुरू होणार

By गणेश वासनिक | Published: January 4, 2024 08:13 PM2024-01-04T20:13:44+5:302024-01-04T20:14:13+5:30

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती, रिद्धपूर येथील थीम पार्कची पाहणी

The first Marathi university of the state will start from June this year | राज्याचे पहिले मराठी विद्यापीठ यंदा जूनपासून सुरू होणार

राज्याचे पहिले मराठी विद्यापीठ यंदा जूनपासून सुरू होणार

अमरावती: रिद्धपूर येथे येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी रिद्धपूर येथे दिले. पाटील यांनी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत कारंजेकर बाबा, गोविंद्रप्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वाईंदेशकर तसेच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, तहसीलदार नरेश आकनुरी, गोविंद गुरुकुल आश्रमशाळेचे सचिव सुभाष पावडे, मुख्याध्यापक संजय कोहळे आदी यावेळी उपस्थित होते.

मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा थीम पार्कची पाहणी करताना पाटील म्हणाले की, येत्या जून २०२४ पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. विद्यापीठ स्थापनेच्यादृष्टीने अभ्यासक्रम, कुलगुरूंची निवड, विद्यार्थ्यांना सोई-सुविधा तसेच आवश्यक बाबींची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी. या विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी विशेष कॅम्पेन आयोजित करण्यात यावे. विद्यार्थी निवडीचे निकष, अभ्यासक्रम आदींबाबत लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना दिले. येथील म्हाइंभट सभागृह, ज्ञानकेंद्र, भक्तनिवारा आदींची पाहणीही पाटील यांनी केली.

मराठी साहित्याची गंगोत्री ठरली रिद्धपूर
मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अमूल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री रिद्धपूर ठरली आहे. यामुळे रिद्धपूर ही महानुभाव पंथाची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे. 'लीळाचरित्रा'सारखा आद्य ग्रंथ जेथे लिहिला गेला त्या स्थानाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनामार्फत येत्या जूनपासून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.

 

Web Title: The first Marathi university of the state will start from June this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.