अचलपुरात विदर्भातील पहिले कांदा खरेदी केंद्र सुरू; मुहूर्ताला ५० टन कांदा खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 11:08 AM2022-06-14T11:08:26+5:302022-06-14T11:13:48+5:30
राज्याच्या कृषी विभागाच्या प्रयत्नातून प्रथमच विदर्भातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होणार आहे.
अचलपूर (अमरावती) : मुंबई येथील खासगी कांदा खरेदी संस्था कंपनीतर्फे विदर्भात प्रथमच ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून गांधी पूल अचलपूर येथे प्रहार शक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने कांदा खरेदी होत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने प्रथमच विदर्भातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होणार आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दैयनीय अवस्था झाली आहे. पिकवलेला कांद्याचा लागवडीचा खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील कंपनी अचलपूर येथील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार आहे.
रविवारी मुहूर्तमेढ राज्यमंत्री कडू यांच्या हस्ते खानापूर (तट्टे नगर ) येथील शेतकरी शेवाणे या शेतकऱ्याचा मुहूर्तावर कांदा खरेदी करण्यात आला. बाजार भावापेक्षा जास्त दर मिळणार असल्याचे यावेळी बीज ऑन गो कंपनीचे संचालक शौनक भार्गव यांनी सांगितले.
उद्घाटन प्रसंगी बच्चू कडू म्हणाले की, नाशिकच्या शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न नसून संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. म्हणून प्रायोगिक तत्त्वावर प्रथमच अचलपूर येथे खरेदी केंद्र सुरू केले आहे. येथील शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न करीत आहोत.
प्रसंगी साईराम अय्यर, यश अग्रवाल, जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चान, वानखडे, महाएफपीसीचे संचालक इंगळे, प्रहार शकती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक संजय तट्टे, सतीश आकोलकर, राहुल तट्टे, सुधीर पवार, तुषार शहाने, गौरव कपिले, अंकुश शेवतकर, ऋषी तट्टे आदी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सतीश अकोलकर यांनी केले. प्रास्ताविक संजय तट्टे यांनी केले. यावेळी ५० टन कांदा खरेदी करण्यात आला.