३१ ऑगस्टला दिसणार ‘ब्लू मून’ सन १५२८ मध्ये पहिली नोंद, एकाच महिन्यात दोन पौर्णिमा
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: August 6, 2023 02:40 PM2023-08-06T14:40:39+5:302023-08-06T14:40:53+5:30
जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला खगोलशास्त्रात ‘ब्लू मून’ म्हणण्याचा प्रघात आहे.
गजानन मोहोड
अमरावती : जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला खगोलशास्त्रात ‘ब्लू मून’ म्हणण्याचा प्रघात आहे. या महिन्यात ३१ ऑगस्टला ‘ब्लू मून’ दिसणार आहे. या महिन्यातील पहिली पौर्णिमा १ ऑगस्ट रोजी होती.
कोणत्याही दोन पौर्णिमांमध्ये २९.५ दिवसांचे अंतर असते. त्यामुळे पहिली पौर्णिमा महिन्याच्या सुरुवातीला येते, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्लू मून’ म्हणण्याची पद्धत आहे. फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्याने या महिन्यात कधीच दोन पौर्णिमा येत नाहीत. हा महिना वगळता कोणत्याही महिन्यात दोन पौर्णिमा येऊ शकतात. ‘ब्लू मून’ची सर्वात जुनी नोंद सन १५२८ मधील आहे. कधी-कधी एकाच वर्षात दोनवेळा ‘ब्लू मून’ येतो. एकाच वर्षात दोनवेळा ‘ब्लू मून’ दिसण्याचे चक्र १९ वर्षांनी असते. हा चंद्र इतर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणेच असताे, त्यात वेगळेपणा काहीही नसतो. त्यामुळे पौर्णिमेच्या चंद्रात उगाचच निळेपणा शोधण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.
घटनेला अंधश्रद्धा जोडू नये, आवाहन
अवकाशातील कोणतीही घटना असली की त्यामागे अंधश्रद्धा जोडल्या जातात. परंतु, जनतेने अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद तथा हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.