मेळघाटच्या वनपालास रायपूर येथे ओलीस ठेवले; व्याघ्र अधिकारी पोलीस बंदोबस्त रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 10:23 PM2022-06-13T22:23:15+5:302022-06-13T22:23:41+5:30

Amravati News वन्यजीव शिकारप्रकरणी आरोपी अटक करण्यास गेलेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांवर आदिवासींनी हल्ला करून, एका वनपालाला ओलीस ठेवले. यामुळे खळबळ उडाली असून, चिखलदरा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आले आहे.

The forester of Melghat was held hostage at Raipur; Tiger officers dispatch police escort | मेळघाटच्या वनपालास रायपूर येथे ओलीस ठेवले; व्याघ्र अधिकारी पोलीस बंदोबस्त रवाना

मेळघाटच्या वनपालास रायपूर येथे ओलीस ठेवले; व्याघ्र अधिकारी पोलीस बंदोबस्त रवाना

googlenewsNext
ठळक मुद्देसात चौशिंगा, भेकराची शिकार प्रकरण

अमरावती : वन्यजीव शिकारप्रकरणी आरोपी अटक करण्यास गेलेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांवर आदिवासींनी हल्ला करून, एका वनपालाला ओलीस ठेवले. हा प्रकार मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या रायपूर येथे सोमवारी सायंकाळी घडला. यामुळे व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडाली असून, चिखलदरा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आले आहे.

             ३ जून रोजी सिपना वन्यजीव विभागाच्या रायपूर परिक्षेत्रात पाच चौशिंगा व दोन भेकरे अशा सात वन्यजीवांची पाणवठ्यावर विषयुक्त पदार्थ टाकून शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी यात समीर सोगेलाल चतुर याला अटक केली. सोमवारी अचलपूर न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सहभागी आरोपींची नावे माहीत झाल्याने, त्यांना अटक करण्यासाठी ताफा गेला असता, गावकऱ्यांनी संतप्त होऊन चऱ्हाटे नामक वनपालास ओलीस ठेवले व वनपथकावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी व पोलीस रवाना

या घटनेची माहिती मिळताच, व्याघ्र प्रकल्पातील काही ठिकाणातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह चिखलदारा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. घटनेसंदर्भात चिखलदरा पोलिसांना व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांनी दिल्याचे ठाणेदार राहुल वाढवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाने रायपूर येथून चार ते पाच आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर, आदिवासींचा संताप उफाळून आला व सदर प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

व्याघ्र प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी रायपूर येथे व्याघ्र कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची माहिती दूरध्वनीद्वारे दिली. त्या संदर्भात लेखी तक्रार अजूनपर्यंत आली नाही. पोलिसांचे एक पथक दिमतीला पाठविण्यात आले आहे.

- राहुल वाढवे, ठाणेदार, चिखलदरा.

Web Title: The forester of Melghat was held hostage at Raipur; Tiger officers dispatch police escort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Melghatमेळघाट