एकाच वेळी निघाली दोन जिवलग मित्रांची अंत्ययात्रा; कुटुंबावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2022 02:00 PM2022-10-03T14:00:11+5:302022-10-03T14:03:59+5:30
दोघेही घरात एकुलते, यवतमाळला गेले होते देवी दर्शनाला
धामणगाव रेल्वे (अमरावती) : बारावीपर्यंत एकाच वर्गात शिकलेल्या दोघा मित्रांना मृत्युनेदेखील एकाच दिवशी आणि एकाच दिवशी गाठले. धामणगावातील भगतसिंग चौकात ही वार्ता धडकताच परिसर शोकसागरात बुडाला. कारण मृत युवक हे घरात एकुलते आणि उच्च शिक्षित होते.
यवतमाळ-बाभूळगावहून धामणगाव रेल्वे येथे दुचाकीने परतणाऱ्या युवकांना अज्ञात वाहनाने नांदुरानजीक जोरदार धडक दिली. या धडकेत मयूर शंकरराव नेवारे (२६) व प्रणव गजाननराव वानखडे (२४) हे तरुण ठार झाले. रुद्र राऊत (१७) याच्यावर सेवाग्राम येथे उपचार होत आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
मृत मयूर हा उच्च शिक्षण घेऊन एका खासगी कंपनीत धामणगावातच नोकरी करीत होता. प्रणय हा मेकॅनिकल इंजिनियर होता. पुण्याच्या एका कंपनीत दोन वर्षे जॉब केल्यानंतर त्याला बंगळुरू येथे कंपनीत रुजू होण्यासाठी कॉल आला होता. शनिवारी महालक्ष्मीचा प्रसाद घेऊन एकूण नऊ जण धामणगाव रेल्वे येथून यवतमाळ येथे देवी दर्शन व विविध देखावे पाहण्याचा आनंद लुटण्याकरिता दुचाकीने गेले होते. परत येताना मयूर व प्रणव यांच्यावर काळाने आघात केला. शनिवारी सायंकाळी दोन्ही जिवलग मित्राची एकाच वेळी अंत्ययात्रा निघाली. यावेळी जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
मयूर नेवारे व प्रणय वानखडे हे दोन्ही युवक अमर शहीद भगतसिंग चौक येथील श्री दत्त मंदिर येथील रहिवासी होते. सर्वांशी परिचित असल्याने मृत्यूची बातमी कळताच अमर शहीद भगतसिंग चौकात युवा वर्ग मोठ्या प्रमाणात गोळा झाला. परिसरातील श्री नव अंबिका उत्साही मंडळ येथील देवीच्या मंडपातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले.