इंग्रजांची देण; माखला गावात २०० च्या वर आंब्यांचे वृक्ष असणारी आमराई, गावात दोन हजारपेक्षा जास्त आंब्यांची झाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:25 AM2024-05-30T11:25:57+5:302024-05-30T11:26:47+5:30
सातपुडा पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून ९७४ मीटर उंचावर वसलेल्या माखला या गावात २०० च्या वर आंब्यांचे वृक्ष असणारी आमराईदेखील इंग्रजांचीच देण आहे. विशेष म्हणजे १७०० लोकसंख्या असणाऱ्या या गावात आजच्या घडीला तब्बल दोन हजारांच्या वर आंब्याची झाडं आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
मनीष तसरे -
अमरावती : इंग्रज भारत सोडून गेले, मात्र जाताना ते अनेक गोष्टी भारतात सोडून गेले. भारत सोडताना त्यांनी अनेक इमारती, उद्योग, रेल्वे, बोगदे, पूल असं बरंच काही भारतात आपली आठवण म्हणून ठेवून गेले. सातपुडा पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून ९७४ मीटर उंचावर वसलेल्या माखला या गावात २०० च्या वर आंब्यांचे वृक्ष असणारी आमराईदेखील इंग्रजांचीच देण आहे. विशेष म्हणजे १७०० लोकसंख्या असणाऱ्या या गावात आजच्या घडीला तब्बल दोन हजारांच्या वर आंब्याची झाडं आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
असे आले इंग्रज माखल्यात :
माखला या गावात खुमानसिंह या राजाचं राज्य होतं, असं गावकरी सांगतात. १८५७ च्या राष्ट्रीय उठावादरम्यान तात्या टोपे यांनी माखला गावातील खुमानसिंह राजाच्या राजवाड्यात आश्रय घेतला होता. तात्या टोपेंचा पाठलाग करीत इंग्रज घनदाट जंगल परिसरात असलेल्या माखला गावात पोहोचले. इंग्रजी फौज येत असल्याची चाहूल लागताच तात्या टोपेंनी तिथून पळ काढला. तात्या टोपेंना सहारा दिला म्हणून इंग्रजांनी या परिसरातील एकूण दीडशे कोरकू आदिवासी बांधवांना फाशी दिली आणि त्यांचे मृतदेह पहाडाखाली खोल दरीत फेकून दिले. तेव्हापासून माखला गावापासून काही अंतरावर असणारी दरी ही भूतखोरा या नावानं ओळखली जाते.
इंग्रज माखल्याच्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात : मेळघाटातील अतिशय उंच भागांपैकी एक असणारा माखला हा परिसर पाहून इंग्रज भारावून गेले होते. या परिसराचा विकास व्हावा अशी कल्पना इंग्रजांना सुचली. त्यावेळी विविध फळझाडांनी बहरलेल्या या भागात इंग्रजांनी आंब्याची २०० झाडे आणून लावली. काही वर्षांतच इंग्रजांची आमराई बहरली. आज माखला गावात दोन हजारांच्यावर आंब्याची झाडं आहेत.
काेड गावातील प्रत्येक आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात आंब्याचं झाड आहे. येथील लोकांनी या आंब्याला वेगवेगळी नावेदेखील दिली आहेत. याशिवाय येथील परिसरात कोळशी, कुंकू, आरंग, जांभूळ, वड, हिरडा, मोह, उंबर, आदी प्रकारचे वृक्ष आहेत. शिवाय यासह निळसर पांढऱ्या रंगाची नाजूक फुलं तसंच रानचमेली, कारवी, माहोळ, आदी वेलीही या भागात आढळतात. मेळघाट पर्यटकांनी या ठिकाणी फक्त वाघ पाहायला न येता येथील संस्कृती, येथील झाडेसुद्धा पाहायला यायला हवे. - प्रदीप हिरुळकर (मेळघाटचे जाणकार)
आदिवासींच्या भाषेतील आंब्याचे प्रकार
इंग्रजांनी निर्माण केलेल्या माखल्याच्या आमराईमध्ये विविध प्रजातीचे आंबे आहेत. त्यात गोब्या आम, कटर आम, शिकल आम, ढपका आम, डोकोडोको आम, गुरगुटी आम अशा आगळ्यावेगळ्या नावानं या भागातील आंब्याच्या प्रजाती ओळखल्या जात असल्याची माहिती माखला गावातील रहिवासी असणाऱ्या लाडकीबाई जामुनकर यांनी दिली.