तरूणीने दिली 'टिप' त्याने उडविली लाखांची रोख! २५० ग्रॅम सोने, २० लाख रुपये चोरीला
By प्रदीप भाकरे | Published: October 11, 2022 06:46 PM2022-10-11T18:46:35+5:302022-10-11T18:46:53+5:30
तरूणीच्या मित्राने तिच्या नातेवाईकाच्या घरातून तब्बल २५० ग्रॅम सोने व २० लाखांची रोकड लंपास केली.
अमरावती : तरूणीने दिलेल्या माहितीच्या आधारे तिच्या मित्राने तिच्या नातेवाईकाच्या घरातून तब्बल २५० ग्रॅम सोने व २० लाखांची रोकड असा २८ लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे. एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून, त्या तरूणीला देखील अटक केली जाणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी दोघांना अटक केल्यानंतर हा घटनाक्रम समोर आला. भातकुली तहसील समोरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमधून तब्बल २५० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. शनिवारी सायंकाळी ही घटना उघड झाली होती. दरम्यान, प्लॉट विक्रीतून आलेली २० लाखांची रोखसुध्दा चोरीला गेल्याचे बयान तक्रारदार महिलेने दुसऱ्या दिवशी नोंदविले होते. त्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी या चोरी प्रकरणात दोघांना अटक केली. शोएब खान मंजूर खान (२३, रा. ताजनगर) आणि शेख जुबेर शेख ताज (३१, रा. फियाननगर) असे अटक चोरांची नावे आहेत.
सीसीटिव्हीने सोडविला गुंता
पोलिसांनुसार, ज्यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली, त्यांच्या शहरातीलच जवळची नातेवाईक असलेल्या १९ वर्षीय तरुणीने शेख जुबेरला नातेवाईकाच्या घरातील दागिने व रोखबाबत माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेच्या दिवशी शोएब खान व शेख जुबेर हे एका पांढऱ्या रंगाच्या कारने अपार्टमेंटसमोर फेऱ्या मारताना दिसले. याचवेळी कारमध्ये एक तरुणी असल्याचेही दिसले. पोलिसांनी त्या दिशेने तपास चालविला.
दुसऱ्याच दिवशी विकली कार
फ्रेजरपुरा पोलीस त्या कारचा शोध घेत असतानाच १० ऑक्टोबर रोजी रात्री यशोदानगर चौकात फूटेजमधील कारप्रमाणेच एक कार दिसली. पोलिसांनी पाठलाग करुन ती कार थांबवून कारमध्ये असलेल्या तरुणाची चौकशी केली. तर ती कार आपण कालच ७० हजार रुपयात शेख जुबेरकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्या तरुणाच्या माध्यमातून शेख जुबेरला ईतवारा बाजारात बोलवले, त्याचवेळी त्याच्यासोबत शोएब खानसुध्दा होता. या दोघांनाही पोलिसांनी ठाण्यात आणले. त्यावेळी सुरूवातीला आमचा सहभाग नाही असे त्यांनी सांगितले मात्र पोलिसांसमोर दोघांनीही चोरीची कबुली दिली.
लव्ह ॲंगल तपासणार
त्या तरूणीच्या माहितीवरून चोरी केल्याची कबुली दोघांनी दिल्याने फ्रेजरपुरा पोलिसांनी तिलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अद्याप अटक केलेली नाही. २० लाखांची रोख व चोरीचे दागिने जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. ही कारवाई फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर, क्राईम पोलीस निरिक्षक नितीन मगर, पोलीस निरिक्षक निशीकांत देशमुख, व त्यांच्या पथकाने केली आहे. ती तरूणी एकाची प्रेयसी की दोघांची मैत्रिण? या दिशेने देखील तपास केला जाणार आहे.