मांत्रिकांना सरकार देणार मानधन, प्रशिक्षणही; मेळघाटातील आदिवासींच्या उपचारांसाठी ऑफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 07:20 AM2023-03-28T07:20:46+5:302023-03-28T07:20:57+5:30
मेळघाटात कुपोषण, माता-बालमृत्यूचा प्रश्न कायम असल्याने ८ वर्षांपूर्वी प्रशासनाने भूमकांची मदत घेऊन त्यांना रुग्णालयात येण्याचे आवाहन केले.
- नरेंद्र जावरे
परतवाडा (जि. अमरावती) : पुरोगामी महाराष्ट्रात आदिवासी रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा खुद्द भोंदूबाबा मांत्रिकांच्या (भूमका) दारात पोहोचली आहे. भूमकांनी रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी त्यांना रुग्णालयात रेफर करण्यास पुढाकार घ्यावा व प्रतिरुग्ण शंभर रुपये मानधन मिळवावे, अशी ऑफरच दिली आहे. यासाठी मंगळवारपासून दोन दिवसीय प्रशिक्षण धारणी, चिखलदरा तालुक्यांत होणार आहे.
मेळघाटात कुपोषण, माता-बालमृत्यूचा प्रश्न कायम असल्याने ८ वर्षांपूर्वी प्रशासनाने भूमकांची मदत घेऊन त्यांना रुग्णालयात येण्याचे आवाहन केले. मात्र, आर्थिक मोबदला नसल्याने भूमकांचा प्रतिसाद नव्हता. त्यामुळे पुन्हा तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रशिक्षण आणि रुग्ण कल्याण समितीकडून भूमकांना मानधन मिळणार आहे.
भूमकांची संख्या ६०१
धारणीत ३१५, तर चिखलदरा तालुक्यात २८६ असे ६०१ भूमका आहेत. आदिवासी उपचारासाठी आधी भूमकाकडे, गरजेनुसार रुग्णालयात जातात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि रुग्ण दगावतात. अनेकदा उपचाराच्या नावावर चिमुकल्यांना विळा तापवून चटके दिल्याच्या घटना घडल्या आहेत.
आदिवासी रुग्णाचा एक जीव जरी वाचला तरी तो लाखमोलाचा ठरेल. याच चांगल्या हेतूने आरोग्य विभागाने भूमकांसाठी दोन दिवस प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. - दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती