आश्रमशाळेच्या स्वयंपाकी पदासाठी मुख्याध्यापकाने दोन लाख उकळले; महिलेकडून तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:12 AM2024-09-23T11:12:41+5:302024-09-23T11:13:44+5:30

Amravati : प्रश्नचिन्ह'च्या तत्कालीन मुख्याध्यापकाकडून बनावट नियुक्तिपत्र

The headmaster forked two lakhs for the post of ashram school cook; Complaint filed by woman | आश्रमशाळेच्या स्वयंपाकी पदासाठी मुख्याध्यापकाने दोन लाख उकळले; महिलेकडून तक्रार दाखल

The headmaster forked two lakhs for the post of ashram school cook; Complaint filed by woman

लोकमत न्यूज नेटवर्क 
नांदगाव खंडेश्वर :
तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील 'प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेत स्वयंपाकी पदावर नोकरी लावून देण्यासाठी तत्कालीन मुख्याध्यापकाने दोन लाख रुपये उकळले. त्याने एकूण सात लाखांची मागणी केली होती, अशी तक्रार मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाण्यात महिलेकडून नोंदविण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


पोलिस सूत्रांनुसार, वहिता नूरदास भोसले (२९, रा. पारधी बेडा, मंगरूळ चव्हाळा) असे तक्रारदाराचे, तर प्रशांत बबन गोरामण (३२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तत्कालीन मुख्याध्यापकाचे नाव आहे. १ सप्टेंबर २०२२ रोजी वहिता भोसले यांना मुख्याध्यापक प्रशांत गोरामण याने सात लाखांची मागणी करीत स्वयंपाकी पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखविले. ही प्रचंड मोठी रक्कम असल्याने ती देऊ शकत नाही, असे म्हणताच त्याने तूर्तास दोन लाख रुपये दे , असे सांगितले. उर्वरित पाच लाख रुपये या पदाचे अॅप्रूव्हल आल्यानंतर पगारातून कापले जातील, असे स्पष्ट केले. वहिताने दोन लाख रुपये दिल्यानंतर तिला शाळेच्या लेटर पॅडवर नियुक्तिपत्र मिळाले. तिने या पदावर कामदेखील केले. तथापि, स्वयंपाकी पदाकरिता प्रस्तावच नसल्याचे काही दिवसांनंतर तिच्या निदर्शनास आले. खोटे नियुक्तिपत्र देऊन फसवणूक केल्याचे लक्षात येताच तिने मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी प्रशांत गोरामणविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा नोंदविला. 


समाजाने हेटाळणी केलेल्या मुलांच्या सक्षमीकरणासाठी 'प्रश्नचिन्ह' 
मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह स्कूल ही महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांतील अनाथ आणि आदिवासी, विशेषतः फासेपारधी समाजाच्या मुलांना मोफत शिक्षण आणि निवासी सुविधा पुरवण्यासाठी समर्पित ना-नफा संस्था आहे. या वंचित मुलांना इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे दर्जेदार शालेय शिक्षण तसेच त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय मतीन भोसले यांनी बाळगले आहे.


"प्रशांत गोरामण यांनी उदात्त विचारांनी सुरू केलेल्या कार्यावर, संस्थेवर अनेक आरोप लावले होते. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत कागदपत्रेही बनावट आढळून आली होती. त्यामुळे मार्च २०२४ च्या सुमारास त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे."
- मतीन भोसले, संस्थापक, प्रश्नचिन्ह


 

Web Title: The headmaster forked two lakhs for the post of ashram school cook; Complaint filed by woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.