घुईखेडवासीयांचे उपोषण चौथ्याही दिवशी सुरूच; अतिक्रमणाचा मोबदला न मिळाल्याने उचलले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 01:33 PM2022-03-11T13:33:31+5:302022-03-11T14:25:59+5:30

७ मार्चपासून यवतमाळ सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर घुईखेडवासी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

The hunger strike of Ghuikhed residents continues on the fourth day | घुईखेडवासीयांचे उपोषण चौथ्याही दिवशी सुरूच; अतिक्रमणाचा मोबदला न मिळाल्याने उचलले पाऊल

घुईखेडवासीयांचे उपोषण चौथ्याही दिवशी सुरूच; अतिक्रमणाचा मोबदला न मिळाल्याने उचलले पाऊल

Next

घुईखेड (अमरावती) : चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील संयुक्त मोजणीतून सुटलेल्या अतिरिक्त व उर्वरित नझूल अतिक्रमणातील बांधकामाचा मोबदला न मिळाल्यामुळे नागरिक यवतमाळ येथील सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. गुरुवारी चौथ्याही दिवशी उपोषण सुरूच होते. अधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरली आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील नागरिकांचे बेंबळा प्रकल्पामध्ये घर संपादित झालेले आहे. त्यामध्ये अनेकांच्या घरासमोरील नझूल बांधकामाचा (अतिक्रमण) मोबदला अद्याप मिळाला नाही. यासाठी त्यांनी स्वतः जलसंपदा विभागाला भेट देऊन पत्रव्यवहार केला आहे. परंतु, अद्यापही त्यांना मोबदला मिळालेला नाही. याअगोदर कार्यालयामार्फत विविध याद्यांद्वारे नागरिकांना अतिक्रमण बांधकामाचा मोबदला दिला आहे. मात्र, अनेकांना अद्याप कुठलाही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे ७ मार्चपासून यवतमाळ सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर घुईखेडवासी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

गुरुवारी चौथ्याही दिवशी यावर तोडगा निघाला नसून नागरिक उपोषणावर ठाम आहेत. बेंबळा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता स.शि. मुन्नोळी यांनी दोन वेळा उपोषणमंडपी भेट देऊन चर्चा केली. परंतु, या प्रकरणात ठोस कारवाई केल्याशिवाय उपोषणात माघार घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

राज्यमंत्री बच्चू कडूंनी दखल घ्यावी

बेंबळा विभागातर्फे यवतमाळ जिल्ह्यातील जमिनी संपादित केलेल्या गावात अतिक्रमणाचा मोबदला व्यवस्थित देण्यात आला. पहूर येथेसुद्धा अतिक्रमणाच्या मोबदल्यासाठी अनुदान आले. परंतु, आम्ही अमरावती जिल्ह्यातील असल्यामुळे सदर विभाग हा आमच्यावर अन्याय करीत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील असलेले जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणात लक्ष घालून दखल घ्यावी व लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी उपोषणकर्ते तथा माजी सरपंच विनय गोटफोडे यांनी केली.

Web Title: The hunger strike of Ghuikhed residents continues on the fourth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.