बायकोचा मारेकरी २८ वर्षांनंतर सापडला चक्क भिकारीवस्थेत; ग्रामीण पोलिसांचे यश
By प्रदीप भाकरे | Published: February 24, 2023 05:21 PM2023-02-24T17:21:20+5:302023-02-24T17:22:21+5:30
गुन्हा केला तेव्हा होता चाळीसीत : कुटूंबियांनी नाही ओळखला
अमरावती : बायकोच्या खुनाचा आरोप शिरी घेऊन चक्क २८ वर्ष फरारीत काढणाऱ्या एका आरोपीला ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी अमरावतीच्या ट्रान्सपोर्टनगर भागातून अटक केली. ज्यावेळी त्याच्याविरूद्ध खून व कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला. तेव्हा तो तरूण होता. आता त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना त्याच्या ओळखीतील लोकांची मदत घ्यावी लागली. २२ फेब्रुवारी रोजी पहाटे दोनच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी तो भिकारीवस्थेत होता.
नुरूल्ला खान वजीरउल्ला खान (६२, ब्राह्मणवाडा थडी) असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध चांदूरबाजार पोलीस ठाण्यात सन १९९५ मध्ये पत्नीचा कौटुंबिक छळ करून तिच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल होता. काही दिवसांनी त्यात खुनाची कलम वाढविण्यात आली. इकडे गुन्हा दाखल झाला, अन् नुरूल्ला खान फरार झाला. फरार आरोपींच्या यादीतील त्याचे नाव चांदूरबाजार ठाण्यातून ब्राम्हणवाडा पोलिसांच्या अभिलेखावर आले. अगदी अलिकडे तो ट्रान्सपोर्ट नगर भागात भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती ब्राम्हणवाडा पोलिसांना मिळाली. ठाणेदार पंकज दाभाडे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिकांच्या बैठकीत तो अमरावती शहरातील नवसारी हद्दीमधे भरलेला इस्तेमा कार्यक्रमात दिसू शकतो, त्यामुळे दिसला तर सांगा, अशा सुचना दिल्या होत्या.
ब्राह्मणवाडा थडी येथील लोकांना तो नवसारीच्या इज्तेमात दिसून आला. त्यानुसार, ब्राम्हणवाडा पोलिसांनी २२ फेब्रुवारी रोजी पहाटे अमरावती गाठले. ट्रान्सपोर्ट नगरातील एका ठि्य्यावर रात्री दोनच्या सुमारास तोे दिसून आला. तो लंगडत लंगडत भीक मागून जीवन व्यतीत करत असल्याचे अटकेनंतर स्पष्ट झाले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या ‘टीम ब्राम्हणवाडा’ने ही यशस्वी कारवाई केली.
११ वर्षांपासून लपवत होता ‘तो’ अस्तित्वब्राह्मणवाडा थडी येथील अभिलेखावर असलेला मारहाणीच्या गुन्हयातील आरोपी आरोपी हरिश्चंद्र बालाजी मावसकर याला परतवाडा हद्दीतील म्हसोना गावाच्या एका संत्रा शेत शिवारातून १५ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले. तो सन २०१२ पासून फरार होता. चांदूरबाजार पोलिसांनी सन २०१२ मध्ये त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला होता. तो आपले अस्तित्व लपवून तथा खोटे नाव सांगून शेतात सोकारी करत होता. त्याने म्हसोना शिवारमालकाला देखील खोटे नाव सांगितले होते.
पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार व वान्टेड असलेल्या आरोपींना शोधण्याचे आदेश पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेला दिले. १५ फेब्रुवारीपासून हाती घेण्यात आलेल्या त्या मोहिमेत १४ फरारी तथा १० पाहिजे असलेले आरोपी पकडण्यात आले.
- अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक