प्रियकराने काढला प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा! गुन्ह्याची कबुली
By प्रदीप भाकरे | Published: May 2, 2023 06:01 PM2023-05-02T18:01:15+5:302023-05-02T18:01:39+5:30
Amravati News प्रियकराने अन्य दोघांच्या साथीने विवाहित प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढल्याचा धक्कादायक घटना मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी येथे उघड झाली.
प्रदीप भाकरे
अमरावती: प्रियकराने अन्य दोघांच्या साथीने विवाहित प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढल्याचा धक्कादायक घटना मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी येथे उघड झाली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. किसन वसंत धुर्वे (४५, रा. राजुरवाडी, ता. मोर्शी) असे मृताचे नाव आहे. १ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास त्याचा मृतदेह गळा आवळलेल्या स्थितीत राजुरवाडी शेतशिवारात आढळून आला होता.
आपल्या भावाचा कुणीतरी गळा आवळून खून केल्याची फिर्याद मृताचा भाऊ सदाशिव धुर्वे यांनी १ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास शिरखेड पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, मोर्शीचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी तातडीने तपासचक्र फिरविले व घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तथा अवघ्या १२ तासात खुनाचा उलगडा करण्यात यश मिळविले. वसंत धुर्वेचा खून अनैतिक संबंधांतून झाल्याचे स्पष्ट झाले. अटक आरोपी बबलू उर्फ इजाजखाॅ शबीरखाॅ पठाण (४०) याने साथीदार सागर रमेशराव मातकर (३०, राजुरवाडी), कृणाल जानराव उईके (२४, तळेगाव ठाकूर) व एका अल्पवयीनाच्या साथीने किसनचा खून केल्याची कबुली दिली.
आरोपीला सांगितले किसन त्रास देतोय
पोलीसांनुसार, आप्त महिलेचे गावातीलच बबलू उर्फ इजाजखाॅ याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची बाब किसन धुर्वे यांच्या लक्षात आल्यावर तो तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. ही बाब त्या महिलेने तिचा प्रियकर बबलू उर्फ इजाजखाॅ याला सांगितली. त्याने साथीदारासह किसनचा खून करण्याचा कट रचला.
सागरने नेले जंगलात
२९ एप्रिल रोजी आरोपी सागर मातकर हा किसनला राजुरवाडी शेत शिवारात घेऊन गेला. तेथे रात्री आठनंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह त्याच जंगलात टाकून आरोपी तेथून पसार झाले. तर दुसरीकडे २९ व ३० एप्रिल रोजी किसनचा शोध घेण्यात आला. दरम्यान, १ रोजी सकाळी मृतदेह आढळून येताच मृताच्या भावाने हत्येची फिर्याद नोंदविली.
यांनी केली उलगडा मोर्शीचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तपन कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू पांडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, अंमलदार संतोष दाने, बळवंत दाभणे, पंकज फाटे, मनोज टप्पे, शकील चव्हाण, मोहन मोरे, सागर धापड, चेतन गुल्हाने, प्रमोद शिरसाट, सरिता चौधरी यांचे पथकाने अवघ्या काही तासात आरोपींना पकडण्यात यश प्राप्त केले.