सिझेरियननंतर ४५ दिवस महिलेच्या पोटातच राहिला नॅपकीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 05:00 AM2022-06-30T05:00:00+5:302022-06-30T05:00:34+5:30
डॉक्टरांनी सिझेरियन करून प्रसूती केली. परंतु, सिझेरियनच्या काही दिवसांनंतर त्या महिलेला ताप आणि पोटाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे दिलीप वाघ यांनी आपल्या पत्नीला २३ जूनला डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी महिलेच्या टाक्यांमधून पल्स येत असल्याने डॉक्टरांनी टाके उघडल्यानंतर त्यांना पोटामध्ये कापडी नॅपकीन आढळून आल्याचे दिलीप वाघ यांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे सिझेरियन झालेल्या महिलेच्या पोटात ४५ दिवसांनंतर कापडी नॅपकीन आढळून आले. सिझेरियन दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही नॅपकीन त्या महिलेच्या पोटात राहिल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे डफरीन येथील भाेंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला असून, त्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या नातेवाइकांनी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून केली आहे.
तिवसा तालुक्यातील दिलीप वाघ यांच्या पत्नीला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याने ११ मे रोजी डफरीन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी सिझेरियन करून प्रसूती केली. परंतु, सिझेरियनच्या काही दिवसांनंतर त्या महिलेला ताप आणि पोटाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे दिलीप वाघ यांनी आपल्या पत्नीला २३ जूनला डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी महिलेच्या टाक्यांमधून पल्स येत असल्याने डॉक्टरांनी टाके उघडल्यानंतर त्यांना पोटामध्ये कापडी नॅपकीन आढळून आल्याचे दिलीप वाघ यांचे म्हणणे आहे. सिझेरियन दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ही नॅपकीन पोटात राहिल्याचा आरोप करत, संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी स्वराज्य संघटनेेने पत्रकार परिषदेतून केली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलन करू
डफरीन रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिला या शेतकरी, शेतमजूर, कामगार कुटुंबातील असतात. उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे हे गरीब लोक देव म्हणून पाहत असतात. परंतु, त्यांचा हा देवच गोरगरीब माता, भगिनींच्या जिवासी खेळ करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा स्वराज्य संघटना ही रुग्णालयात आठ दिवसांत तीव्र आंदोलन करेल, असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवीण खंडारे व अमोल इंगळे यांनी दिला आहे.
११ मे रोजी झाले सिझर
दिलीप वाघ यांच्या पत्नीचे सिझेरियन हे ११ मे रोजी झाले होते. या सिझेरियननंतर दहा दिवसांनी त्यांना डफरीन रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. यानंतर काही दिवसांनी महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिला पती दिलीप वाघ यांनी २३ जून रोजी पीडीएमसी येथे दाखल केले. यावेळी त्यांच्या पोटात कापडी नॅपकीन आढळून आली. यावेळी डॉक्टरांच्या तपासणीदरम्यान तब्बल ४५ दिवसांनी हा कापडी नॅपकीन बाहेर काढण्यात आला.
संबंधित डॉक्टरांना पाठवली नोटीस
सिझेरियन दरम्यान महिलेच्या पोटात कपडा राहिल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या महिलेच्या सिझेरियन दरम्यान उपस्थित असलेले डॉक्टर रजेवर आहेत. परंतु संबंधित डॉक्टर व शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित अन्य कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यात आली असून, ४ जुलैला रुग्णालयात चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- डॉ. तलत खानम,
आरएमओ, डफरिन रुग्णालय