अंबादास दानवेंचा राणा दाम्पत्याला सज्जड दम; हनुमान चालिसेच्या टिकेवरुन पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 10:27 AM2022-10-12T10:27:10+5:302022-10-12T10:28:27+5:30
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी राणा दाम्पत्याला सज्जड दम दिला आहे.
मुंबई - शिवसेना पक्ष नेमका कुणाचा यासाठी शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकले असताना निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना धक्का देत पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याचा मोठा निर्णय घेतला. शिवसेनेच्या इतिहासातील या आजवरच्या सर्वात मोठ्या घडामोडींमुळे शिवसेनेवर मोठं संकट उभारलं आहे. या संकटात भाजपसह इतरही विरोधी पक्ष शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसून येतात. राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट केला होता. त्यावेळी, त्यांना अटकही झाली. त्यामुळे, शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. आता, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी राणा दाम्पत्याला सज्जड दम दिला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते आणि राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे अमरावती दौऱ्यावर आहेत. येथील शिवसैनिकांना संबोधित करताना दानवे यांनी राणा दांपत्यांने केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले. राणा दांपत्यांची हनुमान चालीसा आता कुठे गेली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय येणाऱ्या काळात शिवसैनिक राणा दाम्पत्यांना घरातच हनुमान चालीसा म्हणायला भाग पाडतील, असा सज्जड दमच अंबादास दानवे यांनी दिला आहे. त्यामुळे, आता, राणा दाम्पत्य यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागणार आहे.
काय म्हणाले होते रवी राणा
शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवल्यानंतर भाजपासह इतर विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यातच, आता आमदार रवि राणा यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खासदार नवनीत राणा आणि मला १४ दिवस उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या माध्यमातून तुरुंगात टाकलं, आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला, त्यामुळेच प्रभू श्रीराम यांनी उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण हिसकावून घेतले, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे. हनुमानाने उद्धव ठाकरेंना हा श्राप दिलाय, म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेला विरोध केला, त्याचीच ही सजा त्यांना मिळाली आहे, असेही राणा यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेतील
"उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाही" असं म्हणत नवनीत राणा (Navneet Rana) यांनी निशाणा साधला होता. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडले ते ऐकण्यासाठी लोकं त्यांच्या सभेत आले होते" असंही त्यांनी म्हटलं. तसेच "एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढं नेऊ शकतात" असं देखील सांगितलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राणा यांनी याबाबत व्हिडीओ शेअर केला आहे.