प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 05:00 AM2022-02-26T05:00:00+5:302022-02-26T05:00:58+5:30
पालकमंत्री म्हणाल्या की, जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण भागातील विविध कामांसाठी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. तथापि, प्रशासनाकडून अनेक कामांना सुरुवात झाल्याचे दिसत नाही, असा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. निविदाप्रक्रिया झालेल्या कामांचे आदेश आजच काढा. उर्वरित निविदाप्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण भागात विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून मोठ्या प्रमाणावर निधी देऊनही अजूनही अनेक कामांना सुरुवातच झालेली नाही. हे अत्यंत गंभीर असून, याबाबत कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश आजच काढावे व उर्वरित कामांची निविदाप्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. आपण स्वतः दोन दिवसांनी पुन्हा आढावा घेऊ, असे निर्देश महिला व बालविकासमंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी दिले.
जिल्हा परिषदेतील जिल्हा नियोजन समितीविषयक कामकाजासंबंधी बैठक पालकमंत्री ना. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, पूजा आमले, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी सभापती जयंत देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाल्या की, जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण भागातील विविध कामांसाठी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. तथापि, प्रशासनाकडून अनेक कामांना सुरुवात झाल्याचे दिसत नाही, असा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. निविदाप्रक्रिया झालेल्या कामांचे आदेश आजच काढा. उर्वरित निविदाप्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
अनेक कामांच्या दीड वर्षांपासून प्रशासकीय मान्यता मिळूनही कामे सुरू झालेली नाहीत. तीर्थक्षेत्र, जनसुविधा, १५वा वित्त आयोग, अंगणवाडी, वर्गखोली, दवाखाना बांधकाम आदी अनेक नियोजित कामांना चालना द्यावी. कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावीत. जिल्हा परिषद प्रशासनाने कामांचा नियमित आढावा घ्यावा. प्रत्येक अंगणवाडीत बोलकी अंगणवाडी उपक्रम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पुन्हा दोन दिवसांनी आढावा घेणार
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशाचे पालन झाले की नाही, हे पाण्यासाठी पुन्हा दोन दिवसांनी आढावा घेण्यात येणार आहे. सर्व कामांच्या प्रगतीबाबत बुकलेट सादर करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तीर्थक्षेत्र विकास योजनेत अनेक कामे प्रलंबित आहेत.