अमरावतीत मॉडेल शाळांचा पायलट प्रोजेक्ट; जिल्हा परिषदेची संकल्पना, ४२ शाळांचा होणार कायापालट
By जितेंद्र दखने | Published: December 14, 2022 07:24 PM2022-12-14T19:24:14+5:302022-12-14T19:24:19+5:30
अमरावतीतील मॉडेल शाळांमध्ये पायलट प्रोजेक्टची संकल्पना राबवण्यात येणार आहे.
अमरावती: जिल्हा परिषद अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील ३ शाळा आदर्श शाळा इंद्रधनुष्य शाळा म्हणून विकसीत करण्याचा मिनीमंत्रालयाचा संकल्प आहे.या योजनेतंर्गत १४ तालुक्यातील ३ शाळांमध्ये भौतिक, शैक्षणिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्याना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झेडपीच्या शिक्षण विभागाचा आहे.मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये प्रत्येक शाळेतला स्मार्ट क्लास रूम,इतर भौतिक सुविधा तसेच अत्याधुनिक शैक्षणिक साहीत्य व विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकासाठी शिक्षकांना प्रशिक्षण आणि पायाभूत चाचण्याच्या माध्यमातून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या व्दारे गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्याना दिले जाणार आहे.याशिवाय शैक्षणिक विकासही होईल हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेसोबतच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान तसेच आयसीआयसीआय फाउंडेशन व इतर सामाजिक संस्था तसेच लोकसहभागातून हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.या उपक्रमात १४ तालुक्यातील ४२ शाळांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्यात १४ शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध असलेल्या प्रत्येक तालुक्यातील १ या प्रमाणे १४ शाळामध्ये हा उपक्रम प्राधान्याने राबविला जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्यात उर्वरित शाळांमध्येही या सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
पहिल्या टप्यातील शाळा
भौतिक सुविधा असलेल्या शाळांमध्ये अमरावती तालुक्यातील माहूली जहॉगीर,अचलपूर मधील पथ्रोट कन्या शाळा,अंजनगाव सुजी तुरखेड,भातकुली कामनापूृर,चांदूर रेल्वे बग्गी,चांदूर बाजार घाटालाडकी उर्दू,चिखलदरा बोराळा, दर्यापूर शिंगणापूर,धामनगांव रेल्वे हिंगणगाव,धारणी खाऱ्या टेंभरू,मोर्शी नेरपिंगळाई मुले,नांदगाव खंडेश्र्वर मांजरी म्हसला,तिवसा गुरूदेव नगर,वरूड घोराड आदी १४ शाळांचा समावेश आहे.
भौतिक सुविधा नसलेल्या शाळा
पुसदा,टाकळी जहागीर अमरावती,धामणी ,कांडली उर्दू अचलपूर,अंजनगाव सुजी कारला,हसनापूर पारडी,भातकुली जावरा कोलटेक,शिरजगांव कोरडे,सोनोरा बु चांदूर रेल्वे, देऊरवाडा, देवीनगर चांदूर बाजार, अंबापाटी, सत्ती चिखलदरा, रामतिर्थ, साईनगर गायवाडी दर्यापूर,धामनगांव रेल्वे जुना धामणगाव,तळणी रेल्वे धामनगांव रेल्वे, कुटूंगा, पाटीया धारणी, भाेईपूर,वाघोली मोर्शी,खंडाळा खुर्द,दाभा नांदगाव खंडेश्र्वर,धामंत्री,दापोरी खुर्द तिवसा, करजगाव गांधीनगर, लिंगा वरूड अशा २८ शाळांमध्ये भौतिक सुविधा नाहीत.
जिल्हा परिषदेने यापूर्वी जिल्ह्यात बाला अंगणवाडी केंद्र मॉडेल म्हणून विकसित केले आहे. अतिशय कमी खर्चात अंगणवाडी मॉडेलचा प्रोजेक्ट यशस्वी झाला.त्यानंतर आता झेडपीच्या प्रत्येक तालुक्यातील आदर्श शाळा इंद्रधनुष्य शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहे. त्यासाठी नियोजन केले जात आहे. अशी माहिती अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.