पोलिस ठाणे होणार चकाचक; ६७ भंगार वाहनांच्या मालकांचा शोध
By प्रदीप भाकरे | Published: December 16, 2023 03:37 PM2023-12-16T15:37:18+5:302023-12-16T15:37:52+5:30
नांदगाव पेठ ठाण्यात ६७ वाहने बेवारस : अन्यथा होणार लिलाव
अमरावती : शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये पडून असलेल्या दुचाकी, चारचाकी तथा वाहनांचे भंगार हटवून पोलिस ठाणी चकाचक करण्यासाठी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पुढाकार घेतला असून, या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. पोलिस ठाण्यातील ती वाहने मूळ मालकांनी घेऊन जावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील दहाही पोलिस ठाण्यांसह वाहतूक शाखेत देखील त्यापेक्षा अधिक बेवारस वाहने मूळ मालकांच्या प्रतीक्षेत आहेत. नांदगाव पेठ पोलिस ठाण्यातही ५७ दुचाकी व दहा कार बेवारस पडल्या आहेत.
अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांमध्ये, तसेच अपघातांत, बेवारस अशी जमा केलेली वाहने पोलिस ठाण्यांमध्ये वर्षानुवर्षे धूळखात पडून असल्याचे चित्र पाहावयास मिळते. पोलिस ठाण्याच्या इमारतीजवळ अनेकदा या वाहनांचा खच पडलेला असतो. या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेताना पोलिसांची दमछाक होत असल्याने ‘भंगार’ वाढतच जाते. यामुळे पोलिस ठाणे की जुन्या वाहनांचे गोदाम? असा प्रश्न बघणाऱ्यांनाही पडतो. यामुळे पोलिस ठाण्याच्या सौंदर्यात बाधा येत असते. ही बाब ओळखून पोलिस आयुक्तांनी पुढाकार घेत त्यांनी पोलिस ठाण्यांच्या आवारातील वाहनांची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. चोरांच्या ताब्यातून पकडण्यात आलेली तसेच पोलिसांनी जप्त केलेली वाहने त्यांच्या मालकांचा शोध न घेता तशीच पोलिस ठाण्यांमध्ये पडून राहतात. त्याची विल्हेवाट लावण्याची सवड मिळत नसल्याने वर्षानुवर्षे ऊन-पाऊस-वाऱ्यात त्यांची अवस्था भयंकर होती. अनेकदा त्यात डासांची पैदास होऊन पोलिसांनाच मलेरिया, डेंग्यूची लागण झाल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. त्याअनुषंगाने शहर पोलिस आयुक्तांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे.
-----------
...तर केला जाईल लिलाव
पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, ठाणेदार प्रवीण काळे यांनी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यामधील बेवारस वाहनांची शोधमोहीम हाती घेतली आहे. भंगार झालेल्या वाहनांमधील बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेतला जात आहे. बेवारस वाहनांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. ज्या वाहनांचे मूळ मालक मिळून येतील, त्यांची वाहने त्यांच्याकडे सुपूर्द केले जातील. अन्यथा, उर्वरित वाहनांचा लिलाव करून विक्री करण्यात येणार आहे. नांदगाव पेठ ठाण्यातील काही वाहने अपघातग्रस्त, तर काही वाहने इन्शुरन्समध्ये असल्याने मूळ मालकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.
काही वाहनांवर बनावट क्रमांक असल्याचे आढळून आले. वाहनांचे चेसिस नंबर आणि इतर माहितीच्या आधारे मूळ वाहनधारकांचा शोध घेतला आहे. आरसी बुक व आधार कार्डच्या माध्यमातून वाहनाची ओळख पटल्यास मालकास वाहन देऊ. ठाण्यात ५७ दुचाकी व १० कार बेवारस आहेत.
- प्रवीण काळे, ठाणेदार, नांदगाव पेठ