दरनिश्चिती झाली... सोयाबीनला ५१ हजार, कपाशीला मिळणार ६० हजार
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 3, 2023 03:59 PM2023-05-03T15:59:25+5:302023-05-03T16:00:25+5:30
खरिपाकरिता पीक कर्ज वाटपाचे दर निश्चित, बँकाद्वारा स्वीकृत
गजानन मोहोड/ अमरावती
अमरावती : महिनाभरावर खरीप हंगाम आल्याने सर्व स्तरावर लगबग सुरू झालेली आहे. यंदाच्या हंगामात पीक कर्ज वाटपासाठी १४५० कोटींचे लक्ष्यांक देण्यात आलेले आहे. यासाठी जिल्ह्यातील बँकांद्वारा पीक कर्ज दराची निश्चिती केलेली आहे. तांत्रिक गट सभेने निश्चित केलेले दर बँकांनी स्वीकृत केलेले आहेत. यामध्ये सोयाबीनला हेक्टरी ५१ हजार, तर कपाशीला ६० हजार रुपये दरांनी कर्ज मिळणार आहे.
यंदा पीक कर्जवाटपाचे लक्ष्यांक निश्चितीला तसा उशीरच झाला. त्यापूर्वीच काही बँकांनी कर्जवाटप सुरूदेखील केलेले आहे. यासंदर्भात राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत कर्जाचे टार्गेट निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर बँकर्सच्या (डीएलबीसीला) बैठकीला विलंबच झाला. यामध्ये टार्गेट व पीक कर्जवाटपाचे दर निश्चिती करण्यात आली. मागच्या हंगामापेक्षा यावर्षी अंशत: वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्ह्यात विविध बँकांच्या ३६३ शाखा आहे व या शाखांना खरिपासाठी १४५० कोटी व रबीसाठी ४७० कोटींचे लक्ष्यांक व कर्जवाटपासाठी विविध पिकांचे हेक्टरी कर्ज दर निश्चित करण्यात आलेले आहे. यानुसार काही बँकाचे पीक कर्ज वाटप सुरू झाले आहेत.
बँकानिहाय लक्ष्यांक
राष्ट्रीयीकृत बँका : ८६७.५० कोटी
ग्रामीण बँक : १७.५० कोटी
जिल्हा बँक : ५६५ कोटी
एकूण लक्ष्यांक :१४५० कोटी